Lehenga Girl Viral Video: मागील दिड ते 2 वर्षांपासून सोशल मीडियावर रिल्सचा बोलबाला आहे. रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीत लोकप्रिय होण्यासाठी लोक काहीही करतात आणि संकट ओढवून घेतात अशी अनेक प्रकरणं वेळोवेळी समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीमधील एका तरुणीबरोबर घडला आहे. स्कूटीवर बसून रील शूट करुन तो पोस्ट करणं महागात पडलं आहे.
हेल्मेट न घालता स्कूटी लावणारा आपला हा रील या तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केला. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या स्कूटीच्या नंबर प्लेटवरुन या तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी या मुलीकडे तपास सुरु केला असता तिच्याकडे साधं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच गाडी चालवण्याचा परवानाही नसल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या तरुणीला तब्बल 6 हजारांचा दंड ठोठावला. या मुलीला वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं अशी समज दिली आणि यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडीओमध्ये ही तरुणी लेहंगा, नेकलेस आणि बरेच दागिने घालून स्कूटी चालवताना दिसत आहे. या व्हिडीओला तरुणीने 'सजना जी वारी वारी' हे 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' या चित्रपटाचं गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ या मुलीच्या स्कूटीच्या बाजूने चालत असलेल्या बाईकवरुन शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ दिल्लीमधील कीर्ती नगरमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. केवळ सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी हा सारा प्रकार केल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लगेच समजतं.
दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर करत अगदी मिम्सच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीचं हे रिल बेवकूफियां गाण्यासहीत शेअर करताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असा सल्ला दिला आहे.
Going 'Vaari Vaari Jaaun' on the road for a REEL makes your safety a REAL WORRY!
Please do not indulge in acts of BEWAKOOFIYAN! Drive safe.@dtptraffic pic.twitter.com/CLx5AP9UN8
— Delhi Police (@DelhiPolice) June 10, 2023
अशापद्धतीने गाडी चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते असं पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्ली पोलिस अनेकदा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंची स्वत: दखल घेत कारवाई करत असतात. नियमांचे पालन करण्यासाठी अनेकदा पोलिस असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन नियम मोडणाऱ्यांविरोधात काय कारवाई करण्यात आली आणि किती दंड आकारण्यात आला याची माहिती देतात. या माध्यमातून दंडाच्या भितीने तरी लोक असे प्रकार करणार नाहीत अशी पोलिसांची अपेक्षा असते.