बुरारी हत्याकांडाची पुनरावृत्ती! तंत्र-मंत्र, कंबर-हात-गळ्यावर लाल धागे... 5 लोकांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण

Delhi Vasant Kunj Suicide Case : दिल्लीतील वसंत कुंज परिसरात वडील आणि चार मुलींच्या आत्महत्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. याला Burari 2.0 असं म्हणत आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2024, 11:20 AM IST
बुरारी हत्याकांडाची पुनरावृत्ती! तंत्र-मंत्र, कंबर-हात-गळ्यावर लाल धागे... 5 लोकांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण  title=

वसंत कुंज परिसरात एका व्यक्तीची त्याचा चार दिव्यांग मुलींसह आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्नशील आहे. पोलिसांना अशी शंका आहे की, हे प्रकरण तंत्र-मंत्र याच्याशी संबंधित तर नाही ना. रविवारी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मधील बुरारी आत्महत्या प्रकरणाशी हे प्रकरण संबंधित आहे. 

काय आहे प्रकरण?

हीरालाल शर्मा नावाच्या कारपेंटरला त्याच्या चार दिव्यांग मुलींसह मृतावस्थेत घरी आढळले. सुरुवातीच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ही कौटुंबिक आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत होतं. पण फॉरेंसिक तपासात धक्कादायक बाब समोर आली. चार मुलींच्या कंबरेत, हातात आणि गळ्यात लाल रंगाचे धागे बांधले होते. यामुळेच पोलिसांना शंका आली की, हे प्रकरण तंत्र-मंत्रशी निगडीत तर नाही ना? पोलिसांना घटनास्थळी एक मिठाईचा डब्बा मिळाला आहे. ज्यामुळे या गोष्टीची शंका आणखी बळावली. 

बुरारी प्रकरण काय आहे? 

दिल्ली पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये उत्तर दिल्लीच्या बुरारी परिसरात एकाच कुटुंबातील 11 लोकं डोळ्यावर पट्टी बांधून तोंडावर टेप लावलेल्या मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी या प्रकरणाला बुरारी प्रकरणाशी जोडलं आहे. बुऱ्हाडी प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून ठेवलं होतं. 

वर्षभरापूर्वी पत्नीचा मृत्यू 

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हीरालाल शर्मा यांच्या पत्नीचं गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. या दरम्यान हे कुंटूब आर्थिक संकटाशी झुंजत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने समाजाशी संबंध तोडले होते. शर्मा यांनी गेल्या नऊ महिन्यांत कोणाशीही बोलले नसल्याचे आतापर्यंत आम्हाला समजले आहे. तो आणि त्याच्या मुली बाहेर क्वचितच दिसत होत्या. पत्नीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने सर्वांशी संबंध तोडले होते.

घरातून विषाची तीन पाकिटे सापडली

अधिकाऱ्याने सांगितले की, शर्मा रंगपुरी गावात चार मजली निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक मजल्यावर आठ फ्लॅट्स आहेत आणि त्यापैकी बहुतेक भाड्याने आहेत. शुक्रवारी दुपारी सापडलेल्या मृतदेहावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. पोलिसांना घरातून 'सल्फास'ची तीन पाकिटे, पाच ग्लास आणि एक चमचा संशयास्पद द्रव आढळून आला.

शेवटचे मंगळवारी पाहिले 

शेजारच्यांनी सांगितले की, त्यांनी शर्मा आणि त्यांच्या मुलींना मंगळवारी शेवटचे पाहिले. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही बाहेरच्या रस्त्यावरून जप्त करण्यात आले आहे. ज्यात शर्मा हातात एक पॅकेट घेऊन घरात जाताना दिसत आहेत. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

असे प्रकरण उघडकीस आले 

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीचे मालक नितीन चौहान यांना इमारतीच्या देखभाल कर्मचाऱ्यांनी दुर्गंधीबद्दल माहिती दिली, त्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने दरवाजा तोडला आणि शर्मा एका खोलीत मृतावस्थेत पडलेले आढळले, तर त्यांच्या चार मुलींचे मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिका-याने सांगितले की, शर्मा दरमहा सुमारे 25,000 रुपये कमावत होते, परंतु जानेवारीपासून ते कामावर गेले नव्हते.