दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम

दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.  

Updated: Feb 26, 2020, 05:48 PM IST
दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम title=

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी चार मृतदेह सापडलेत. यात एका आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या २४ तासांमध्ये तीन बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दंगलग्रस्त भागांची पाहणी केली आहे. ते पंतप्रधान मोदी यांना आपला अहवाल सादर करणार आहेत.

दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.  दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला.