दिल्लीच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना मुस्लिम मुलगी अजित डोवलांना म्हणाली...

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.

Updated: Feb 26, 2020, 08:11 PM IST
दिल्लीच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना मुस्लिम मुलगी अजित डोवलांना म्हणाली... title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. डोवल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची माहिती घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानं आपण ही पाहणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दिल्लीच्या रस्त्यावर परिस्थितीचा आढावा घेताना अजित डोवल यांनी काही नागरिकांशी संवादही साधला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती डोवल यांनी दिली. पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काही समाजकंटकांनी हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. 

अजित डोवल यांच्यासमोर दिल्लीतल्या सामान्य नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जाफराबादमध्ये एका मुस्लीम मुलीनं डोवल यांच्यासमोर दिल्लीमधली परिस्थिती सांगितली.

'मी विद्यार्थिनी आहे. आम्ही रात्री झोपूही शकत नाही. आम्ही हिंसाचार करत नाही. मला अभ्यासही करता येत नाहीये,' असं ही मुस्लिम मुलगी डोवाल यांना म्हणाली. डोवाल यांनी या मुलीला अजिबात काळजी करु नका. ही जबाबदारी सरकार आणि पोलिसांची असल्याचं सांगितलं. 

दिल्ली पोलीस त्यांचं कर्तव्य पार पाडत नाहीयेत, तुम्ही कडक पावलं उचला, अशी मागणी या विद्यार्थिनीने डोवाल यांना केली. तेव्हा मी तुम्हाला शब्द देतो, असं आश्वासन डोवाल यांनी दिलं. 

दिल्लीतल्या या भागांची पाहणी केल्यानंतर अजित डोवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले.