भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढलं, 'धनुष' शत्रुच्या तोंडचं पाणी पळवणार

ही आहे देशी बोफोर्स..... 

Updated: Apr 8, 2019, 06:07 PM IST
भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढलं, 'धनुष' शत्रुच्या तोंडचं पाणी पळवणार  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची असणारी धनुष तोफ ही सोमवारी भारतीय लष्करात सहभागी करण्यात आली आहे. जबलपूर येथे एका समारंभात अधिकृतपणे ही तोफ लष्करात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे अर्थातच भारतीय सैन्याचं बळ आणखी वाढलं आहे. दारुगोळा निर्मिती मंडळ अर्थात Ordnance Factory Board यांच्याकडून 'धनुष' या स्वदेशी तोफांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. सैन्यदलाकड़ून स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मिती परियोजनेचं समर्थन करत जवळपास ११४ धनुष तोफांची निर्मिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जास्तीत जास्त अंतचरावरील शत्रूवर भेदक मारा करणारी ही भारतीय लष्करातील पहिलीच तोफ असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकारच्या सहा तोफा पहिल्या टप्प्यात सैन्यदलाकडे सोपवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षअखेरीपर्यंत सैन्यात १८ धनुष तोफांची तुकडी दाखल होईल. 

ही आहेत धनुषची वैशिष्ट्ये: 

- आठ मीटर लांबी असणाऱ्या या तोफेच्या बॅरलटचं वजन  २ हजार ६९२ किग्रॅ इतकं आहे. 

- 'देशी बोफोर्स' म्हणूनही 'धनुष'चा उल्लेख केला जातो. 

-१५५ मीमी x  ४५ कॅलिबर या लांब पल्ल्याच्या 'धनुष'ची निर्मिती दारुगोळा निर्मिती मंडळ आणि भारतीय सैन्यदल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली आहे. 

-३६० अंशांमध्ये फिरत ३८ किलोमीटर आणि त्याहून जास्तीच्या अंतरापर्यंत मारा करत शत्रूवर मारा करण्याची क्षमता या तोफेमध्ये आहे. 

-प्रकाश आणि अंधारातही ही तोफ तितक्याच भेदकपणे मारा करु शकते. 

-मुळच्या परदेशी बोफोर्सपेक्षा या तोफेची मारक क्षमता ११ किलोमीटरहून जास्त आहे.