नवी दिल्ली: भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला सोमवारी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने आणखी एक झटका दिला. प्रत्यार्पण प्रक्रियेला आव्हान देणारा विजय मल्ल्याचा विनंतीअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता मल्ल्याकडे पुन्हा तोंडी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवस आहेत. यानंतर मल्ल्याच्या अर्जाचे नुतनीकरण झाले तर हे प्रकरण उच्च न्यायालयात जाईल आणि त्याठिकाणी पुन्हा सुनावणी पार पडेल.
पंतप्रधान मोदींमुळे मी पोस्टर बॉय झालोय- विजय मल्ल्या
तर दुसरीकडे ब्रिटनचे गृह सचिव साजिद जाविद यांनी मल्ल्याविरोधात प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ब्रिटन सरकारच्या या आदेशाविरोधात मल्ल्याने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.
UK Court rejected on April 5 the plea of Vijay Mallya against his extradition order. (File pic) pic.twitter.com/ag2mVpM7ZX
— ANI (@ANI) April 8, 2019
यापूर्वी ९ डिसेंबर रोजी वेस्टमिनिस्टर दंडाधिकारी न्यायालयाने सीबीआय आणि ईडीच्या आरोपांची दखल घेत मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. पाच जानेवारीला मुंबईमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला आर्थिक गुन्हे कायदा २०१८ नुसार फरारी घोषित केले. त्यामुळे याच कायद्याचा आधार घेत विजय मल्ल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच मल्ल्याने भारतीय बँकांनी कर्जाच्या रक्कमेपेक्षा माझी अधिक संपत्ती जप्त केल्याचे म्हटले होते. मी बँकांकडून ९ हजार कोटींचे कर्ज घेतले. परंतु बँकांनी माझी १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मात्र, तरीही भाजपचे नेते माझ्याविरोधात आरोप करत का फिरतात, असे मल्ल्याने म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजय मल्ल्या भारतात, सरकारची नवी रणनीती