जयललिता यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी, अण्णाद्रमुकला धक्का

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी विजयी मुसंडी मारत सत्ताधारी अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का दिला.

Updated: Dec 24, 2017, 08:46 PM IST
जयललिता यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी, अण्णाद्रमुकला धक्का title=

तामिळनाडू : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी विजयी मुसंडी मारत सत्ताधारी अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का दिला.

किती मिळाली मते?

दिनकरण यांनी अण्णाद्रमुकचे उमेदवार मधुसूदनन यांना ४० हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले. दिनकरन यांना ८९ हजार १३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुकचे उमेदवार मधुसूदनन यांना ४८ हजार ३०६ मते मिळाली. द्रमुकचे एन. मारुथू गणेश यांच्या पारड्यात तिसऱ्या क्रमांकाची २४ हजार ६५१ इतके मते पडली. दिनकरन यांनी ४० हजार ७०७ मतांचे मताधिक्य मिळवून दणदणीत विजय नोंदवला. 

पन्नीरसेल्वम-पलानीस्वामी गटांसाठी धक्का

हा निकाल म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकच्या पन्नीरसेल्वम-पलानीस्वामी गटांसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला आरके नगरमधून पराभव सहन करावा लागला आहे. जयललिता यांचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख होती. दिनकरन हे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या शशिकला यांचे भाचे आहेत. 

जयललिता यांच्यानंतरचं राजकारण

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. आधी फुटलेले पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम गट एकत्र आले. त्यांनी दिनकरन आणि शशिकला यांचीच पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता आरके नगरचा निकाल दिनकरन यांच्या पारड्यात गेल्याने तामिळनाडूच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळेल असं राजकीय जाणकार सांगताहेत.