कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय.
ममता यांनी आधारशी लिंक करण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. यासंबंधीत कोणत्याही आदेशांचं पालन न करता त्यांना आव्हान द्यायचं त्यांनी ठरवलंय.
नोटबंदीच्या वर्षपूर्ती दिनाला त्यांनी 'काळा दिवस' सांगत तृणमूल काँग्रेस मोदी सरकारच्या या निर्णयाचं ८ नोव्हेंबर रोजी काळे झेंडे फडकावून विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दुसरीकडे, मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्याच्या निर्णयाला दूरसंचार विभागाच्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. ही जनहीत याचिका तहसीन पूनावाला यांनी दाखल केलीय. या याचिकेत टेलिकॉम ऑपरेटर्सना या अधिसूचनेवर अंमलबजावणी करण्यास रोखण्याचे आणि आत्तापर्यंत जमवलेले आकडे नष्ट करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आलीय.