चोरण्यासारखं काहीच नसल्याने चोरच Software Engineer च्या घरात ठेऊन गेले 500 रुपये

Thief Leaves Rs 500 At Software Engineer House: पोलिसांना फोन करुन चोरी झाल्यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक वयस्कर व्यक्ती भेटली जिने त्यांना सूंपूर्ण घटनाक्रम सांगितला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 24, 2023, 08:14 AM IST
चोरण्यासारखं काहीच नसल्याने चोरच Software Engineer च्या घरात ठेऊन गेले 500 रुपये title=
पीडित व्यक्तीनेच पोलिसांना सांगितला घटनाक्रम (प्रातिनिधिक फोटो)

Thief Leaves Rs 500 At Software Engineer House: चोरांसंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. कधीतरी चिठ्ठी लिहून जाणारे चोर तर कधी आपल्याच बावळटपणामुळे पोलिसांच्या तावडीत सापडलेले चोर अशा अनेक बातम्या तुम्ही कधी ना कधी वाचल्या असतील. मात्र सध्या दिल्लीमध्ये चर्चा आहे ती दानशूर चोरांची. या चोरांनी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरात चोरण्यासारखं काहीच नसल्याने स्वत:च काही पैसे ज्या घरात चोरी केली तिथे ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

दानशूर चोरांनी ठेवले 500 रुपये

नवी दिल्लीमध्ये चोरीचं एक भलतच प्रकरण समोर आलं आहे. येथील रोहिणी परिसरामधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरांनीच घरात 500 रुपयांची नोट सोडून गेला. या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरात चोरी करण्यासारखी एकही वस्तू नसल्याने या दानशूर चोरांनी घराच्या उंबऱ्यावर 500 रुपयांची नोट ठेवली आणि ते निघून गेले.

घरातले कुठे गेले होते?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 8 मधील रोहिणी येथील एका घरामध्ये चोरी झाल्याची माहिती पीसीआर कॉलवर मिळाली. उत्तर रोहिणी पोलीस स्टेशनमधील पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी पोलिसांना फोनवरुन तक्रार करणारी 80 वर्षीय व्यक्ती भेटली. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार 19 जुलै रोजी सकाळी 8 च्या सुमारास तो त्याच्या पत्नीबरोबर गुरुग्रामला गेला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आम्ही गुरुग्रामला गेलो होते अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. 

उंबऱ्यात सापडले 500 रुपये

शुक्रवारी सकाळी या व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्यांनी फोन करुन घराचा टाळा फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर या तक्रारदार व्यक्तीने तातडीने घराकडे धाव घेतली. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडल्याचं त्याला दिसलं. मात्र घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नव्हती. या घरात कोणतीही मैल्यवान वस्तू ठेवलेली नसल्याने चोरांनी काहीच चोरलं नाही. घरातील सर्व तिजोऱ्याही सुरक्षित होत्या. काहीही चोरीला गेलं नाही पण घराच्या उंबऱ्यावर 500 रुपये सापडल्याचं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं.

यापूर्वी एका जोडप्याला देऊन गेलेले 100 रुपये

जून महिन्याच्या सुरुवातीलाही एका जोडप्याला लुटण्यासाठी आलेल्या चोरांनीच या दोघांना 100 रुपये दिल्याची घटना समोर आली होती. या जोडप्याकडे 20 रुपये असल्याने चोरांनीच त्यांना 100 रुपये दिलेली. हा संपूर्ण घटनाक्रम पूर्व दिल्लीतील शारदा येथील फर्श बाजार परिसरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यांना या जोडप्याकडे काहीच सापडलं नाही तर त्यांची दया आल्याने चोरांनी 100 रुपयांची नोट त्यांना दिली होती. त्यानंतर 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासून पोलिसांनी या 2 चोरांना अटक केली होती.