DLF KP Singh Love Story: प्रेमाला काही वय नसतं असं म्हटलं जातं. आयुष्यात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणावरही आपला जीव जडू शकतो. डीएलएफ ग्रुपचे (DLF Group) अमेरिट्सचे चेअरमन के. पी. सिंह (KP Singh) यांच्याबरोबरही असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यांना वयाच्या 91 व्या वर्षी प्रेम झालं आहे. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर सिंह पुन्हा प्रेमात पडले आहेत. के. पी. सिंह यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वत: यासंदर्भातील घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पार्टनरसंदर्भातही या मुलाखतीत बरीच माहिती सांगितली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये के.पी. सिंह (कुशल पाल सिंह) यांनी, "माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. एखाद्या व्यक्तीबरोबर एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर अचानक तुम्ही त्यांना गमावून बसता. त्यामुळे या विरहाचं दु:ख शब्दांमध्ये सांगता येणार नाही असं आहे. तुमचं पूर्ण आयुष्य या अशा धक्क्यामुळे बदलून जातं. मात्र आता माझ्या आयुष्यामध्ये एका नव्या पार्टनरची एन्ट्री झाली आहे. मी पुन्हा प्रेमात पडलो आहे," असं सांगितलं.
के.पी. सिंह यांनी पुढे बोलताना, "मला एक पार्टनर मिळाली आहे. तिचं नाव शीना असं आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या लोकांपैकी एक आहे. ती फार उत्साही आहे. ती मला प्रेरणा देते. शीना प्रत्येक पावलावर माझ्यासोबत असते. ती मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते. आता ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाली आहे," असंही सांगितलं.
के.पी. सिंह यांच्या पहिल्या पत्नीचं वयाच्या 65 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. के.पी. सिंह हे रियल इस्टेट क्षेत्रातील अब्जाधीशांपैकी एक आहेत. एका अहवालानुसार ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये के.पी. सिंह हे 299 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळजवळ 63200 कोटी रुपये इतकी आहे.
रिपोर्टनुसार त्यांनी 1961 साली सासरे राघवेंद्र सिंह यांनी सुरु केलेल्या डेल्ही लॅण्ड अॅण्ड फायनान्स म्हणजेच डीएलएफमध्ये सहभागी होण्यासाठी सेनेतील पोस्टींग सोडली होती. ते पाच दशकाहून अधिक काळापासून कंपनीच्या चेअरमनपदी आहेत. सध्या ते डीएफएलचे अमेरिट्स चेअरमन आहेत.
"माझ्या पत्नीच्या निधनानंतर 6 महिन्यांनी असा निश्चय केला होता की मी पराभूत होणार नाही. मला आयुष्यात पुढे जायचं होतं हे माझ्या पत्नीचे शब्द मला प्रेरणा देणारे ठरले. माझं वैवाहिक आयुष्य फार छान होतं. माझी पत्नी माझी मैत्रिणही होती. तिच्या जाण्याने मी डिप्रेस झालो होतो. मात्र आता माझं आयुष्य बदललं आहे," असंही के.पी. सिंह म्हणाले.