बंगळुरु : प्रचंड पळवापळवी, प्रचंड गदारोळ, महानाट्याचे अनेक अंक पार पडल्यावर भाजपसाठी पुन्हा दक्षिणेचं द्वार खुलं झालं आहे. येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. एच. डी. कुमारस्वामींचा पूर्वीचा हिशोब चुकता करण्याची संधी येडियुरप्पांना पहिल्यांदाच मिळाली.
कर्नाटकातली राजकीय नियती गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन चेहऱ्यांशी सत्तासंघर्षाचा खेळ खेळते. इतिहासात दोन वेळा येडियुरप्पांना मुख्यमंत्री होता होता कुमारस्वामींनी त्यांची खुर्ची पळवली. पण राजकारणात मोका सभी को मिलता है. कुमारस्वामींची खुर्ची गदगदा हलवून अखेर येडियुरप्पांनी ती पटकावली.
२०१७ मध्ये जेडीएसबरोबर युती केल्यानंतर येडियुरप्पांनी १२ नोव्हेंबर २००७ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ समावेशावरुन जेडीएसशी बिनसल्यानं येडियुरप्पांना अवघ्या 8 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2008 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पांच्या नेतृत्वात भाजपला मोठं यश मिळालं आणि 30 मे 2008 ला येडियुरप्पा पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. पण खाण भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकाच्या लोकायुक्तांनी येडियुरप्पांवर ठपका ठेवल्यानं येडियुरप्पांना जुलै 2011 ला राजीनामा द्यावा लागला.
भाजपचं केंद्रीय नेतृत्व चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप करत येडियुरप्पांनी २०१२ मध्ये बंडाचं निशाण उगारत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. २१०३ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला येडियुरप्पांचं बंड चांगलंच महागात पडलं. .भाजपची मोठ्या प्रमाणात मतं खात येडियुरप्पांनी उपद्रवमूल्य दाखवून दिलं. पुढे २१०४ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी येडियुरप्पांची भाजपमध्ये घरवापसी झाली. पुन्हा २०१८ मध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. पण संख्याबळाचं गणित न जुळल्यानं काही दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला.
कर्नाटकात २०१८ मध्ये एच. डी. कुमारस्वामींचा शपथविधी मोठ्या दणक्यात पार पडला होता. तेव्हापासूनच सरकार खिळखिळं करण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केले होते. टिपीकल कर्नाटकी महानाट्यानंतर भाजपाचं मिशन कमळ यशस्वी झालं. देशभरात पंच्याहत्तरीच्या पुढच्या नेत्यांना घरी बसवणाऱ्या भाजपने ७६ वर्षांच्या येडियुरप्पांकडे हे दक्षिणद्वार दिलं आहे.