अल्ट्रा व्हॉयलेट किरणं कोरोना विषाणू नष्ट करणार? DRDOचं खास उपकरण

कार्यालयात किंवा घरातील दैनंदिन गोष्टी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त करण्यासाठी DRDOचं उपकरण...

Updated: Apr 22, 2020, 05:01 PM IST
अल्ट्रा व्हॉयलेट किरणं कोरोना विषाणू नष्ट करणार? DRDOचं खास उपकरण title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO-Defence Research and Development Organisation) कोरोनावर मात करण्यासाठी दोन नवीन उपकरणं तयार केली आहे. ही दोन्ही उपकरणं कार्यालयात किंवा घरातील दैनंदिन गोष्टी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणांच्या उत्पादनांसाठी खाजगी उद्योगांशी चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच ते स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होतील. दोन्ही उपकरणं अल्ट्रा व्हायलेट किरणांद्वारे संक्रमण काढून टाकण्याच्या तत्त्वावर कार्य करतात.

मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आकराचं असलेलं पहिलं उपकरण मोबाईल, घड्याण, कारची चावी, पर्स यासारख्या गोष्टींवर असलेले व्हायरस दूर करण्यासाठी प्रभावी ठरु शकतं. यासाठी, संक्रमित वस्तू या उपकरणाच्या आत ठेवली जाते आणि ती बंद करुन त्यावर एका मिनिटासाठी अल्ट्रा व्हायलेट किरण सोडले जातात. एक मिनिटानंतर वस्तूंवर असलेला व्हायरस नष्ट होण्यास मदत होते.

दुसरं उपकरणही याच तत्त्वावर काम करतं. या उपकरणाला हातात घेऊन एखाद्या फाईलवर, भाजी किंवा दुधाच्या पॅकेटवर एक मिनिटांपर्यंत ठेवलं जाऊ शकतं. उपकरणातून निघणारी अल्ट्रा व्हायलेट किरणं संसर्गाला नष्ट करु शकतात. 

डीआरडीओचे संचालक भुवनेश कुमार यांनी सांगितलं की, या दोन्ही उपकरणांची किंमत जवळपास 2 ते 4 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. आता अनेक ऑफिस सुरु होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे हे उपकरण अतिशय फायदेशीर ठरु शकणार असल्याचं ते म्हणाले.