Jammu Kashmir हादरलं; स्थानिकांना मात्र वेगळीच धास्ती

त्यानंतर आलेल्या ध्वनीलहरी पाहता ...

Updated: Sep 23, 2020, 08:47 AM IST
Jammu Kashmir हादरलं; स्थानिकांना मात्र वेगळीच धास्ती
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : जम्मू काश्मीर Jammu Kashmir भागातील सीमा क्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारी तणावाची परिस्थिती अनेक आव्हानं उभी करत असतानाच मंगळवारी या भागामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. जम्मू आणि बहुतांश काश्मीर भागाला बसलेला हा हादरा आणि त्यानंतर आलेल्या ध्वनीलहरी पाहता स्थानिकांच्या मनात मात्र एक वेगळीच धास्ती असल्याचं पाहायला मिळत आहे. 

एक मोठा आणि भीषण स्फोट व्हावा, असा आवाज झाल्याची माहिती स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार सदर भागात भूकंपाचा धक्का जाणवला.  European-Mediterranean Seismological Centreच्या माहितीनुसार श्रीनगरमध्येही हा हादरा जाणवला. पीटीआय या वृत्तसंस्थेनंही याबाबतची माहिती देत रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिकांनी प्रथमत: या घटनेमुळं एक मोठा स्फोट झाल्याची धास्तीही घेतल्याचं पाहायला मिळालं. 

'बीबीसी'च्या वृत्तानुसार एका वरिष्ठ पत्रकारानं या हादऱ्यांबाबत एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे. २७ ऑगस्टला श्रीनगर विमानतळानजीक भारतीलय वायुदलानं अंडरग्राऊंड स्फोटकांबाबत जी शक्यता वर्तवली होती हा त्याचाच स्फोट तर नव्हता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. EMSCच्या म्हणण्यानुसार याचं केंद्र शिनजियांग होतं. पण असं असल्यास सऊरा, सोनमर्ग, कारगिल, लेह आणि गिलगिट येथे हे हादरे का जाणवले नाही? असा प्रश्न मांडत जाणवलेला धक्का हा अवघ्या काही सेकंदांसाठी आणि अवघ्या श्रीनगरनजीकच्याच भागापुरताच कसा सीमीत होता अशी शंका व्यक्त केली. 

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा हादरा भूकंपाचा नव्हता. बरेच प्रश्न निर्माण करुन गेलेल्या या घटनेमध्ये कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण, यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.