... तर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सहा दिवस लागतील- निवडणूक आयोग

५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लीपची पडताळणी व्हावी, विरोधकांची मागणी

Updated: Mar 30, 2019, 08:35 AM IST
... तर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सहा दिवस लागतील- निवडणूक आयोग title=

नवी दिल्ली: ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीसोबत व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रातील स्लीपची पडताळणी करायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. काही दिवसांपूर्वी देशातील २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएम यंत्रातील मतांसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लीपची पडताळणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंदर्भात अभिप्राय कळवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून यासंदर्भात माहिती दिली. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी करायची झाली तरी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण व्हायला तब्बल सहा दिवस लागतील. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

यंदा निवडणूक आयोगाने देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन बंधनकारक केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होईल. आतापर्यंत ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी करुन निकाल जाहीर केला जायचा. तसेच मतमोजणीवेळी कोणत्याही एका व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांचीच पडताळणी केली जाते.  यासाठी चार ते सहा तासांचा अवधी लागायचा. मात्र, आता ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी करायची झाल्यास यासाठी लागणारा वेळ निश्चितच वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तेव्हा न्यायालय काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक : ...अखेर ताईसाठी दादा धावला...