लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Updated: Mar 29, 2019, 08:37 PM IST
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर title=

मुंबई : चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सजग नागरिकांनो, आधी मतदान करून मगच लुटा सुट्टीचा आनंद, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांनो, ऐका हो ऐका. पाच वर्षांनी मिळणार संधी. संधी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीउत्सवात सहभागी होण्याची आहे. संधी तुमचा राजा ठरवण्याची आहे. ही संधी वाया घालवू नका. मतदारांनी मतदान करावं म्हणून राज्यात ११ एप्रिल १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात चारही दिवस सरसकट सुट्टी नाही. तर ज्या दिवशी मतदान  आहे, त्या भागात फक्त त्या दिवशीच सुट्टी मिळणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे १८ एप्रिल या मतदानाच्या तारखेआधी १७ एप्रिलला महावीर जयंती आहे. तर १९ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार रविवार आहे. तर २९ एप्रिलला सोमवार आहे. त्याच्या आधी शनिवार-रविवार आहे. १८ आणि २९ एप्रिल या दोन मतदानाच्या तारखा सुट्ट्यांना लागून आहेत.

त्याचदरम्यान शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्याही सुरू होत आहेत. पण कृपया बाहेर फिरायला जायचं मतदानाच्या तारखांदरम्यान ठरवू नका. मतदानाची सुट्टी ही मतदानासाठी आहे. सहलीसाठी नाही. महाबळेश्वर, गोवा, केरळ, सिमला-कुलू मनाली, अगदी युरोप. ही सहलीची ठिकाणे आहे तिथेच राहणार आहेत. तिथं कधीही जाता येईल. पण पाच वर्षांनी एकदा येणारा मतदानाचा मुहूर्त चुकवलात तर मात्र पुढची पाच वर्षं तुम्हाला कोणालाही बोलण्याचा अधिकार राहणार नाही.