रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. तब्बल ९ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 

PTI | Updated: Feb 7, 2019, 10:50 PM IST
रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी title=

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. आज तब्बल ९ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पैशांची अफरातफर आणि त्यातून लंडनमध्ये अवैध मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात येत आहे. कालही साडेपाच तास वाड्रा यांची चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या चौकशीत वाड्रा यांना ईडीनं काही पुरावे दाखवले तर वाड्रा यांनीही आपल्याकडील कागदपत्रे सादर केली आहेत. दरम्यान, या चौकशीदरम्यान वाड्रा यांचे ई मेल 'झी २४ तास'च्या हाती लागले आहेत. या ईमेलच्या आधारे वाड्रांची चौकशी सुरू आहे. शस्त्रास्त्रतस्कर संजय भंडारीचा निकटवर्तीय सुमित चढ्ढा आणि वाड्रा यांच्यामधले दोन ईमेल आहेत. 

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या चौकशीवरून राजकारण चांगलंच तापलंय. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपानं वाड्रांची चौकशी करत घातल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर कुठल्याही राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत नसल्याचं भाजपानं म्हटले आहे.  रॉबर्ट वाड्रा यांना आज सकाळी साडेदहा वाजता ईडी कार्यालयात जाणार होते. मात्र, त्यांना उशिर झाला. ते ११ वाजून २५ मिनिटांनी गेलेत. त्यानंतर तब्बल दहा तास ते ईडी कार्यालयात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. यादरम्यान वाड्रा यांची कसून चौकशी करण्यात आली. आता शनिवारी वाड्रा यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रॉबर्ट वाड्रा काल बुधवारी सर्वप्रथम दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले होते. काल त्यांची साडेपाच तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, लंडनच्या १२, ब्रायनस्टोन स्क्वेअर येथील १९ लाख पौंड मूल्याची मालमत्ता वाड्रा यांचीच आहे. लंडनमधील इतरही मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचा 'ईडी'चा आरोप आहे. या खरेदी व्यवहारात मनी लाँडरिंगबाबतच्या कायद्यांचा भंग झाल्याचाही 'ईडी'ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. दिल्लीतील न्यायालयाने या प्रकरणी वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.