... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय

ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.

Updated: Jul 11, 2018, 08:55 PM IST
... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला फटकारले आहे. तुम्हाला या वास्तूंचे संरक्षण करता येत नसेल तर ही वास्तू पाडून टाका, असा संताप सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात व्यक्त केलाय. ताजहमलच्या संरक्षणाबाबत सरकारे उदासिन असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. एकतर आम्ही ताजमहल बंद करु, असा थेट इशाराच दिलाय. ताजमहलच्या डागडुजीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.

जगप्रसिद्ध ताजमहलच्या संरक्षणाबाबत उपाय योजना आखल्या जात नाही. आयफल टॉवरपेक्षाही सुंदर ताजमहल आपल्या देशात आहे. यामुळे देशातील विदेशी चलनाची समस्याही दूर होऊ शकते, अशी टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली.  केंद्र सरकारच्या उदासिन धोरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. मोगलकालीन या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत कोणती भूमिका घेतल्याचे दिसत नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली.

१६ शतकातील उभारलेली ही सुंदर संगमरवरी इमारत पाहण्यासाठी  देशभरासह जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात. मोगल बादशहा  शाहजहाने बेगम मुमताजच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली होती. सर्वोच्च न्यायालयाने युरोपमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरची तुलना टीव्ही टॉवरशी केली. आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात.  हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल  त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे. जर त्याची योग्य देखभाल केली  तर परकीय चलनाचे आपले संकट टळण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या उदासिनतेमुळे देशाचे किती  मोठे नुकसान होत आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारलाही खडसावले.

ताजमहलच्या संरक्षणाबाबत संसदेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अहवालानंतरही सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नसल्याचे मत न्या. एम बी लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने नोंदवले. आग्रा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारास प्रतिबंध असताना त्याचे  उल्लंघन केल्यावरून ताज ट्रेपिजयम झोनच्या अध्यक्षांना  न्यायालयाने काही प्रश्नही विचारले. सर्वोच्च न्यायालयाने प्रारंभी या मोगल स्मारकाच्या संरक्षणासाठी योग्य ते पाऊल उचलण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. प्रदुषणामुळे ताजमहलचा रंग बदलत आहे. ताजमहल पिवळा पडत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते.