मुंबई : नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
ESIC काय आहे?
टॅक्स एक्सपर्ट मनीष गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ESIC कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेमध्ये १० ते २० कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असल्यास ही योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते.
ESIC मध्ये कर्मचारी आणि कंपनी, या दोघांच्या रक्कमेचं योगदान असतं. ही रक्कम वेळो-वेळी बदलत असते. सध्या ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ०.७५ टक्के योगदान दिलं जातं आणि कंपनीकडून ३.२५ टक्के योगदान असतं. ज्या कर्मचाऱ्याचं दररोजचं वेतन १३७ रुपये आहे, त्यांना आपल्या वेतनातील योगदान द्यावं लागत नाही.
ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा आहे. २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेले कर्मचारी या योजनेंतर्गत येतात, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी मासिक वेतनाची मर्यादा १५ हजार रुपये इतकी होती. परंतु २०१६ मध्ये ती वाढवून २१ हजार रुपये करण्यात आली.
काय आहेत फायदे?
ESIC योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकिय सुविधा पुरवल्या जातात. तब्येत बिघडल्यास मोफत इलाजाची सुविधा मिळते. ESICच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो. गंभीर आजार असल्यास खासगी रुग्णालयात पाठवले जाते. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर इलाजाचा संपूर्ण खर्च ESICद्वारा केला जातो.
कर्मचारी एखाद्या गंभीर आजाराने नोकरी करण्यास असमर्थ असल्यास ESIC कडून कर्मचाऱ्याला पगाराच्या ७० टक्के रक्कम देण्यात येईल. जर कर्मचारी काही कारणामुळे अपंग झाल्यास, त्याला पगाराच्या ९० टक्के रक्कम दिली जाईल. कायमस्वरुपी अपंगत्वावर आजीवन पगाराच्या ९० टक्के वेतन दिले जाते.
महिलांसाठी -
ESICमध्ये महिलांना प्रसूती रजा दिली जाते. प्रसूती रजेसह ६ महिन्यांचं वेतनही दिलं जातं. ६ महिन्यांचं वेतन ESIC कडून देण्यात येतं. काही कारणास्तव गर्भपात झाल्यास, ६ आठवड्यांची वेगळी सुट्टीही देण्यात येते.
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही ESICचा फायदा मिळतो. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना पेन्शन सुविधा लागू होते. पेन्शन तीन भागात विभागलं जातं. पहिले, कर्मचाऱ्याच्या पत्नीला, दुसरं मुलांना आणि तिसरं कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांना दिलं जातं.
कसं कराल रजिस्ट्रेशन?
कंपनीकडून ESICचं रजिस्ट्रेशन केलं जातं. यासाठी कुटुंबातील सदस्यांची माहिती द्यावी लागते. कंपनीला नॉमिनीचंही नाव द्यावं लागतं. रजिस्ट्रेशनच्या ९ महिन्यांनंतर ESICची सुविधा मिळण्यास सुरुवात होते.