बीरभूम : पश्चिम बंगाल (West Bengal) च्या बीरभूम (Birbhum) मधील एक अनोखा विषय चर्चेत आला आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकांना खडू, पट्टीच्या ऐवजी चक्क कैची हातात घ्यावी लागली आहे. या घटनेची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.
तर झालं असं की, विद्यार्थ्यांनी केसांना रंग लावल्यामुळे मुख्याध्यापक नाराज झाले होते. याकरता मुख्याध्यापकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. एका रांगेत मुलांना उभं करून मुख्याध्यापकांनी त्यांचे केस कापले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये केस रंगवण्याचे प्रमाण वाढले होते. महाबीर राम मेमोरिअल शाळेत विद्यार्थ्यांना तर याचे वेडच लागले होते. ही गोष्ट मुख्याध्यापकांना न आवडल्यामुळे त्यांनी मंगळवारी मुलांना कार्यालयात बोलवून चक्क कैची हातात घेतली.
या अगोदर मुर्शिदाबादच्या न्यू फरक्काच्या शाळेत न्हावीला बोलवून एकाचवेळी 40 मुलांचे केस कापले होते. तसेच सर्व केसकर्तनालयाच्या चालकांची बैठक घेवून सांगितले की, जर मुलं तुमच्याकडे आले तर त्यांचे केस अगदी योग्य पद्धतीने कापावेत. कोणत्याही स्टाइलमध्ये केस कापू नयेत.
बॉलिवूड कलाकार कायमच विद्यार्थ्यांचे आदर्श राहिले आहेत. आपल्या आवडत्या कलाकाराप्रमाणे आपण आपल्यात बदल करावा असं सगळ्यांनाच वाटतं. आता केस रंगवण्याचे वेगवेगळे प्रकार अगदी सहज बाजारात उपलब्ध होतात. अगदी कमी पैशात न्हाव्याकडे हे सगळं करून मिळतं. म्हणून शालेय विद्यार्थ्यांचा देखील याकडे कल वाढला आहे. असं असताना मुख्याध्यापकांनी उचलेलं हे पाऊल चर्चेचा विषय बनलं आहे.