Pulwama : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक; ४ जवान शहीद, २ दहशतवाद्यांचा खात्मा

सध्या जम्मू- काश्मीरमध्ये गोळीबार सुरू असल्याची म्हणत आहे.  

Updated: Feb 18, 2019, 12:33 PM IST
Pulwama : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक; ४ जवान शहीद, २ दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर : रविवारी रात्री उशिरापासूनच जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली होती. यामध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले आणि सध्या मिळत असणाऱ्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशिद गाझी याचा खात्मा करण्यात आला आहे. अद्यापही या माहितीवर सैन्यदलाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. पण, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी लपून बसलेल्या इमारतीत मोठा स्फोट घडवून आणत लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले असल्याची माहिती मिळाली आहे. 

एनएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चकमक होत असणाऱ्या भागामध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते. सध्या या परिसरात गोळीबार सुरू असल्याचं म्हटलं जात असून, या चकमकीमध्ये ४ जवान शहीद झाले. रविवारी पिंगलान भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. या परिसरात लष्कर पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याचं उत्तर म्हणून लष्कराकडूनही गोळीबार करण्यात आला. ज्या चकमकीत लष्कराच्या जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले.  

शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर डी.एस. डोंडीयाल यांचा समावेश असून, सावेराम, अजय कुमार, हरी सिंग या जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. हे जवान ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफमधील असल्याचं कळत आहे. एकीकडे पुलवामा हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एकदा जवानांना वीरमरण आल्यामुळे देशात दहशतवाद्यांविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. 

पिंगलान भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या भागात वातावरण प्रचंड  तणावाचं आहे. गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील अवंतीपोरा येथे जैश-ए-मोहम्मदकडून एक दहशतवादी हल्ला घडवण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जागतिक स्तरावर या हल्ल्याचा अनेक देशांतून निषेध करण्यात आला. पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष राष्ट्राचा दर्जाही या भ्याड हल्ल्यानंतर काढून घेण्यात आला. पण, तरीही दहशतवादी कारवाया थांबण्याचं नाव घेत नाही आहे.