नवी दिल्ली : 'इंडियन सोसायटी ऑफ क्लिनीकल रिसर्च'ने (आयएससीआर) भारतातील वाढते आजार आणि आजारावरील इलाजासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करत संशोधन आणि नवकल्पनांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे. 'आयएससीआर'चे अध्यक्ष चिराग त्रिवेदी यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या १२व्या वार्षिक सम्मेलनात 'आयएससीआर'च्या सदस्यांनी क्लिनिकल संशोधन आणि त्याच्या लाभांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
भारतीयांमध्ये सतत आरोग्यविषय समस्या वाढताना दिसत आहेत. एखाद्या रोगावर इलाज करण्यासाठी मोठा खर्चही येतो. त्यामुळे या इलाजासाठी येणाऱ्या खर्चावर संशोधन करण्यासाठी अधिक गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे चिराग त्रिवेदी यांनी सांगितले. नवीन संशोधनाविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
'आयएससीआर'ने सांगितले की, गेल्या काही दिवसांत आलेल्या आकड्यांनुसार, भारतातील क्लिनिकल चाचणीची संख्या कमी होत आहे. भारतात क्लिनिकल संशोधन काही वर्षांपूर्वी १.५ टक्के होते, ते आता १.२ टक्क्यांवर पोहचले आहे. हा आकडा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशासाठी अतिशय कमी आहे. भारतातील लोकसंख्या मोठी आहे. भारतीयांमध्ये विविध आजारांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे या वाढत्या आजारांच्या इलाजावर खर्च करण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.