Jammu Kashmir : सुरक्षादलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगामात दहशतवादी लपले असल्याची शक्यता, शोधमोहिम सुरू

Updated: Feb 10, 2019, 02:58 PM IST
Jammu Kashmir : सुरक्षादलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये रविवारी सकाळपासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. देवलर भागातील केल्लम गावात चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून या भागात २ ते ४ दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर या भागात शोधमोहिम सुरू करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली असून परिसरात घेराव घालण्यात आला होता. रविवारी सकाळपासून दोन्ही बाजूने सतत गोळीबार सुरू होता. या चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे. जवळपास ६ तास सुरू असलेली शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

आज सकाळी सुरू झालेल्या या कारवाईनंतर चार तासांनंतरही सतत होत असलेल्या गोळीबारात सुरक्षादलाकडून रॉकेट लॉन्चरच्या मदतीने परिसरातील दोन घरे उडवण्यात आली. सेनेकडून घेराव घालण्यात आला असून यात मोस्ट वॉन्टेड दहशवादी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

 

जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी महिन्यात सुरक्षारक्षकांना मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातही पुलवामात लश्कर-ए-तोयबाच्या जिल्हा कमांडरचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले होते. पुलवामा जिल्ह्यातील चकुरा भागात सेना आणि पोलीस एका संयुक्त गस्तीवर असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. कुलगामात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अल-बद्रच्या सरगना जीनत उल-इस्लामसह दोन दहशतवादी मारले गेले होते.