बटन दाबताच दरवाजा उघडला पण लिफ्ट आली नव्हती, विद्यार्थी 11 व्या मजल्यावरुन खाली कोसळला

सोसायटीची लिफ्ट उघडली पण पाय ठेवताच तो खाली कोसळला.

Updated: Oct 3, 2022, 09:41 PM IST
बटन दाबताच दरवाजा उघडला पण लिफ्ट आली नव्हती, विद्यार्थी 11 व्या मजल्यावरुन खाली कोसळला  title=

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे लिफ्टमध्ये पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय.  तो मणिपाल विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग करत होता. घटनेनंतर सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. यासोबतच अपघाताची माहिती मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. विद्यार्थ्याचे कुटुंबीय जयपूरला रवाना झाले आहेत.

कुशाग्रने आत पाय ठेवताच तो 11व्या मजल्यावरून खाली कोसळला. कुशाग्र मिश्राचा यामुळे जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज ऐकून सोसायटीचे सदस्य घटनास्थळी धावले. पण त्याचा मृत्यू झाला होता. तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली गेली.

कुशाग्र मिश्रा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जयपूरच्या मणिपाल विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग करत होता. हे वर्ष त्याचे दुसरे वर्ष होते. कुशाग्र हा उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी होता. कुशाग्र हा जयपूरमधील अजमेर रोडवरील माई हवेली अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. रविवारी रात्री त्यांनी 11व्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी लिफ्टचे बटण दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला, पण लिफ्ट आली नव्हती.

बिल्डरविरोधात तक्रार

सोसायटीत बसवण्यात आलेली लिफ्ट रोज खराब होत असल्याचे नागरिकांनी सांगितले, मात्र बिल्डर लक्ष देत नव्हता. लिफ्ट दुरुस्त देखील करुन देत नव्हता. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या सोसायटीच्या सदस्यांनीच बिल्डरविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. बिल्डरची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकशीत निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास बिल्डरवर कारवाई करण्यात येईल. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.