राजीव गांधींचे 'भारतरत्न' परत घेणार, विधानसभेत ठराव मंजूर

शिखविरोधी दंगलींचा उल्लेख 'शिखांचं निर्वंशिकरण करण्याचा प्रयत्न' असल्याचं म्हटले गेले आहे.

Updated: Dec 21, 2018, 10:28 PM IST
राजीव गांधींचे 'भारतरत्न' परत घेणार, विधानसभेत ठराव मंजूर

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना दिलेलं भारतरत्न परत घ्यावं, अशी मागणी करणारा ठराव दिल्ली विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. १९८४च्या शिखविरोधी दंगलींमध्ये काँग्रेसचा तत्कालिन खासदार सज्जन कुमारला शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार जर्नेल सिंग यांनी मांडलेला हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. या ठरावामध्ये शिखविरोधी दंगलींचा उल्लेख 'शिखांचं निर्वंशिकरण करण्याचा प्रयत्न' असल्याचं म्हटले गेले आहे.

सभागृहाची तीव्र भावना

दिल्ली सरकारनं सभागृहाची ही तीव्र भावाना केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत पोहोचवावी, असं या ठरावात नमूद करण्यात आले आहे. भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो एकदा दिल्यानंतर परत घेतल्याचं एकही उदाहरण नाही. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या या ठरावावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार ?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.