कोरोनामुळे सोनं ३० हजारांवर? पाहा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती कमी होताना दिसतायेत. 

Updated: Mar 23, 2020, 06:10 PM IST
कोरोनामुळे सोनं ३० हजारांवर? पाहा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर, शेअर बाजारातील अनिश्चिततेचं वातावरण, जागतिक मंदी आणि डॉलरच्या तुलनेत कोसळणारा रुपया या सर्व गोष्टींचा परिणाम संपूर्ण देशासह भारतावरही होताना दिसतोय. शेअर बाजारात सतत पडझड सुरु आहे. पण या संपूर्ण परिस्थितीत सध्या सोनं ही एक अशी गुंतवणूक आहे की जिथे गुंतवणूक पाहायला मिळतेय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीही कोसळताना दिसतायेत. 

बाजारात सोन्याचे दर गेल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये पडल्याचे दिसतात. गेल्या एका महिन्यात सोन्याचा दर 5500 प्रति 10 ग्रॅमने कोसळला आहे. केवळ 6 दिवसांत सोन्याचा दर 40000च्या खाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाच प्रकारचा व्यापार पुढील 15 दिवस सुरु राहिल्यास, सोन्याच्या देशांतर्गत किंमती 10 ग्रॅम प्रति 3000 ने कमी होऊ शकतात.

एस्कॉर्ट सिक्युरिटी रिसर्च हेड असिफ इक्बाल यांनी, सर्वसाधारणपणे जागतिक बाजारात अशा पेचप्रसंगी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. परंतु सोन्याच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे हा कल उलटला आहे. गुंतवणूकदार त्यांचे पैसे कुठे सुरक्षित आहेत याचा अंदाज लावण्यास असमर्थ आहेत. त्यामुळेच गुंतवणूकदार सोन्याची विक्री करून रोख जमा करण्यात गुंतले असल्याचं त्यांनी म्हटलंय.

HDFC सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चलन 'रुपया' कमकुवत होणं हे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती घसरण्याचं कारण ठरतंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचा फायदा भारतीय घेऊ शकत नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने देशात सोन्याच्या मागणीत 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सोन्याचा भाव कमी होत असून तो आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी न झाल्यास पुढील तीन महिन्यांत सोन्याचा भाव 30000 रुपयांपर्यंत येऊ शकत असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.