उंदराला बाईकखाली चिरडून मारल्याने UP पोलिसांकडून एकाला अटक? जाणून घ्या नेमकं प्रकरण

UP Police Arrested A Man For Killing Rat: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने उंदीर मारल्याप्रकरणी या व्यक्तीला तुरुंगात जावं लागत असल्याची चर्चा राज्यभरामध्ये सुरु झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2023, 02:27 PM IST
उंदराला बाईकखाली चिरडून मारल्याने UP पोलिसांकडून एकाला अटक? जाणून घ्या नेमकं प्रकरण title=
पोलिसांनी केलेल्या कारवाईची सध्या तुफान चर्चा आहे

UP Police Arrested A Man For Killing Rat: उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सेक्टर 63 मधील एका व्यक्तीने उंदाराला मारल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. अनेक वेबसाईट्सने यासंदर्भातील बातम्याही दिल्या आहेत. मात्र या बातम्या आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या अटकेमागील खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने आपल्या बाईकच्या चाकाखाली एका उंदराला चिरडल्याचं दिसत आहे. गाडी मागेपुढे करुन ही व्यक्ती उंदराला चिरडत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. हा व्हिडीओ मामूरा गावातील खान बिर्याणीच्या दुकानासमोरील असल्याचं सांगितलं जात आहे. या उंदाराला अनेकदा चिरडल्यानंतर आणि उंदराचा मृत्यू झाल्यानंतर ही व्यक्ती बाईकवरुन घटनास्थळावरुन निघून केली. याच व्हिडीओमुळे संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर पोलिसांनी या अटकेमागील खरं कारण काय आहे हे सांगितलं आहे. 

अटक करण्यात आलेली व्यक्ती कोण?

सोमवारी फेज-3 नोएडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या बीट पोलिसांच्या गाडीने गोपनीय माहितीच्या आधारावर व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती खान बिर्याणीचं दुकान चालवणारीच आहे. या विक्रेत्याचं नाव जैनुलाउद्दीन असं आहे. या घटनेनंतर जैनुलाउद्दीन फरार झाला होता. पोलिसांनी जैनुलाउद्दीनला उंदाराला चिरडून मारल्याप्रकरणी अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. एका उंदाराला मारल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी यावरुन पोलिसांची आणि यंत्रणेची खिल्लीही उडवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी इतर महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावं असंही काहींनी म्हटलं. पण पोलिसांनी ही अटक वेगळ्याच प्रकरणात असल्याचं सांगितलं आहे. नोएडाच्या पोलीस उप-महानिरिक्षकांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

अटकेचं खरं कारण काय?

पोलिसांनी गस्त घालताना फेज 3 च्या पोलिसांनी जैनुलाउद्दीनला अटक केली. जैनुलाउद्दीन हा नोएडामधील मामूरा गावातील गल्ली क्रमांक 5 चा रहिवाशी आहे. नोएडामधील आपल्या बिर्याणीच्या दुकानामध्ये ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्याशी वाद घालून जैनुलाउद्दीन फरार होण्याचा विचार करत होता. पोलिसांनी त्याला तपासासंदर्भात विचारलं असता तो पोलिसांशीही हुज्जत घालू लागला. त्यामुळेच जैनुलाउद्दीनला कलम 151 अंतर्गत अटक करण्यात आली. या अटकेचा संबंध अनेकांनी जैनुलाउद्दीनने उंदीर चिरडून मारल्याच्या प्रकरणाशी जोडला. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओचा आणि जैनुलाउद्दीनच्या अटकेचा काहीही संबंध नाही असं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.