चेन्नई : जगभरात कोरोना साथीमुळे अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींचे व्यवसाय ठप्पं झाले आहेत. शेतकऱ्याची परिस्थिती तर त्याहून खराब झाली आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर लोकं स्वत:ला सावरतायत तोपर्यंत पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांचे पाय खेचले. ज्यामुळे बरेच लोकं कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. लॉकडाऊनमधील अनेक लोकांच्या संघर्षाच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत, ज्यामुळे लोकांचे डोळे पाणावले आहेत.
तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याची कहाणी देखील अशीच आहे. लॉकडाऊनमुळे या शेतकऱ्याचे जगणे किती कठीण झाले आहे? ही कहाणी एक फोटो आपल्याला सांगत आहे. म्हणूनच या शेतकऱ्याच्या संघर्षाची कथा सध्या देशात सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
तिरुथानी नागराज हा एक शेतकरी आहे. जो आपल्या शेतात भातशेती करत असत. परंतु त्याचे बरेच नुकसान झाल्यावर त्याने फुलांचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. या फुलांचा उपयोग हार, मंदिराच्या बाहेर पूजेसाठी आणि लग्न समारंभ इत्यादींसाठी केला जाईल, म्हणून हे पिक घेण्याचा नागराज ने निर्णय घेतला.
यासाठी त्याने कर्ज घेतले आणि फुलांच्या पिकासाठी शेत केली. कित्येक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा हे पीक तयार झाले, तेव्हा सरकारने देशात सर्वत्र कुलूप लावले. ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कारण त्याची ही फुलं शेतातचं सडून गेली.
जवळपास वर्षभर नागराज आपल्या परिस्थितीशी लढत राहिला, परंतु त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. या काळात त्याच्या जवळचे सगळे पैसे संपले. कर्जाचाही डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु असे असूनही त्याने पुन्हा फुलांचे पीक उगवण्याचा निर्णय घेतला.
पैशाच्या कमतरतेमुळे नागराजने यावेळेस आपल्या मुलाला शाळेतून मिळालेल्या सायकलच्या मदतीने नांगरणी केली, ज्यामुळे त्याचे नांगरणीला लागणारे पैसे वाचले. त्याने आपल्या मुलाच्या मदतीने आपले संपूर्ण शेत नांगरले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा सायकलला शेतात धक्का देत आहे आणि वडील बैलाच्या जागी स्वत: उभे राहूण ती सायकल खेचत आहेत आणि नांगरणी करत आहे.
नागराज यांचा मुलगा धनाचेझियान 11 वर्षांचा आहे. आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्याबरोबरच तो ऑनलाइन अभ्यास देखील करतो.
लॉकडाऊनमुळे नागराज सारखे अनेक शेतकरी अशा परिस्थितीला तोंड देत आहेत. परंतु सरकारकडून यांच्याकडे दुर्लक्षच होत आहे. ज्यामुळे दिवसेंदिवस यांचे आयुष्य अधिक कठोर होत चालले आहे. त्यामुळे सरकारने खेड्या-पाड्यातील लोकांकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.