वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन? खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याने खळबळ

पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला, तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती

शिवराज यादव | Updated: Jan 2, 2025, 07:50 PM IST
वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन? खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याने खळबळ title=

वाल्मिक कराड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवा दावा केला आहे. पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला, तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती, असा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट.

वाल्मिक कराडच्या शरणागतीवरुन सरकार आणि पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. वाल्मिक कराड आणि अजितदादांमध्ये कार कनेक्शन समोर आलं आहे. वाल्मिक कराडनं पुण्यात पोलिसांसमोर सिनेस्टाईल सरेंडर केलं. वाल्मिक ज्या कारमधून पुणे सीआयडीसमोर शरण येण्यासाठी आला ती कार अवघ्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यात होती. अजित पवार मस्साजोगला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून आरोपी सरेंडर झाल्याचा दावा खासदार सोनवणे यांनी केला आहे. 

वाल्मिक कराड ज्या गाडीतून CID ऑफिसला आला ती गाडी शिवलिंग मोराळे यांची आहे.

शिवलिंग मोराळे यांचे वाल्मीक कराडसोबत जवळचे संबंध आहेत. 

शिवलिंग मोराळे हेच औषधांची पिशवी घेऊन कराडला भेटण्यासाठी सीआयडी ऑफिसमध्ये आले होते. 

शिवलिंग मोराळे हे धनंजय मुंडेंचेही निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा निकटवर्तीय आहे. संतोष देशमुखांचं सांत्वन करण्यासाठी अजित पवार गेले होते. तेव्हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय त्यांच्यासोबत होता. त्यामुळं अजितदादांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातली भूमिका बेगडीपणाची आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरेंडर होण्यासाठी वाल्मिकसोबत जे लोक होते, त्यांची चौकशी होणार का? ज्या गाडीतून वाल्मिक कराड पोलिसांसमोर हजर झाला, त्या गाडीची चौकशी केली जाणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.