शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज पुन्हा बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष

40 दिवसांपासून सुरू आहे शेतकरी आंदोलन

Updated: Jan 4, 2021, 10:24 AM IST
शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज पुन्हा बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष title=

नवी दिल्ली : 40 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आज तरी तोडगा निघेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. चर्चेची ही सातवी फेरी असून अद्याप शेतकरी आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. दुपारी २ वाजता सरकार आणि शेतकरी संघटनेच्या प्रमुखांमध्ये ही बैठक होते आहे. आज तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत शेतकरी संघटना आहेत. तर १३ जानेवारीला कृषी कायद्याची कागदपत्र जाळून संक्रांत साजरी करणार आहेत.

एका महिन्याहून अधिक काळापासून दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याचा विरोधात शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. आज चर्चेची पुढील फेरी होईल. दोन्ही बाजूंच्या चर्चेची ही सातवी फेरी असेल. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी आशा व्यक्त केली आहे की आजच्या चर्चेमुळे तोडगा निघेल आणि तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन लवकरच संपुष्टात येईल.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकांच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, कृषी कायद्याबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे.

सहाव्या फेरीच्या चर्चेदरम्यान आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चार पैकी दोन विषयांवर सहमती झाली. प्रस्तावित वीज कायदा, पेंढा जाळण्याशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. तथापि, अद्याप गतिरोध दोन मुख्य मागण्यांवर कायम आहे. त्याचवेळी 2 जानेवारीला सुमारे 40 शेतकरी संघटनांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी 26 जानेवारी रोजी आपले ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहनांसह दिल्ली येथे मोर्चा काढतील. असा इशारा देण्यात आला आहे.