'आम्हाला बाहेरून नाही तर आतूनच धोका'

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.

Updated: Aug 17, 2017, 10:14 PM IST
'आम्हाला बाहेरून नाही तर आतूनच धोका' title=

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे. भारताला बाहेरून धोका नाही. पाकिस्तान आणि चीन भारताचं काहीच वाकडं करू शकत नाहीत. पण आतमध्ये चोर बसला आहे जो वाटोळं करतोय, असं वक्तव्य फारुख अब्दुल्लांनी केलं आहे.

आधी आमचं युद्ध इंग्रंजांशी होतं पण आता आपल्यांबरोबरच आहे. मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. मी हिंदुस्तानी मुस्लिम आहे, असंही अब्दुल्ला म्हणाले. काही लोक जोडण्याच्या गोष्टी करतात पण ते तोडण्याचंच काम करत आहेत, असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला आहे.

आम्ही इमानदार नसल्याचा आरोप केला जातो पण खरं हे आहे की तुम्ही दिलदार नाही. एक पाकिस्तान बनवलं आणखी किती पाकिस्तान बनवायची आहेत, असा सवाल अब्दुल्लांनी उपस्थित केला. १९४७मध्ये आम्ही सहज पाकिस्तानमध्ये गेलो असतो पण गेलो नाही. आम्हाला लोकं पाकिस्तानी म्हणतात पण आम्ही पाकिस्तानी किंवा इंग्रजी मुसलमान नाही तर हिंदुस्तानी मुसलमान आहोत, असं अब्दुल्ला म्हणाले.

बिहारमध्ये महागठबंधन तोडून नितीश कुमार भाजपसोबत गेले. यामुळे जेडीयूचे नेते शरद यादव यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात बंड केलं. यानंतर आता त्यांनी दिल्लीमध्ये संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनाला फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत काँग्रेसचे गुलामनबी आझाद उपस्थित होते.