आता असे चालणार नाही, 'एअर इंडियाची थकबाकी भरा आणि रोखीने तिकीट खरेदी करा'

Air India Travel : आता उधारीवर एअर इंडिया प्रवास बंद. तसे आदेश अर्थमंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. 

Updated: Oct 28, 2021, 07:26 AM IST
आता असे चालणार नाही, 'एअर इंडियाची थकबाकी भरा आणि रोखीने तिकीट खरेदी करा'

नवी दिल्ली : Air India Travel : आता उधारीवर एअर इंडिया प्रवास बंद. तसे आदेश अर्थमंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. आधीची थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर इंडियामार्फत (Air India) केंद्रीय सरकारी अधिकाऱ्यांना प्रवास करता येत होता.

एअर इंडियामार्फत (Air India) करण्यात येणाऱ्या प्रवासाबाबत अर्थ मंत्रालयाने नवीन आदेश जारी केला आहे. या नवीन आदेशानुसार सर्व केंद्रीय विभागांना सांगितले आहे की, 'एअर इंडियाची थकबाकी भरा आणि रोखीने तिकीट खरेदी करा' (Finance Ministry directs all ministries and departments of Central Govt to clear dues of Air India and purchase tickets from the airline in cash)

भारत सरकारने बुधवारी सर्व मंत्रालये आणि विभागांना कर्जबाजारी एअर इंडियाची थकबाकी त्वरित भरण्यास सांगितले आहे. तसेच, सरकारने सांगितले की, आतापासून फक्त रोखीने तिकीट खरेदी करा. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला (Talace Pvt. Ltd.) 18,000 कोटी रुपयांना एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला होता.

एअर इंडियानेच प्रवास 

महत्त्वाचे म्हणजे, वित्त मंत्रालयाच्या (Finance Ministry) खर्च विभागाने 2009 च्या आदेशात म्हटले होते की अधिकारी फक्त एअर इंडियाने प्रवास करू शकतात. यामध्ये LTC सह हवाई प्रवासाच्या बाबतीत (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही) समावेश आहे, जेथे भारत सरकार या हवाई मार्गांचा खर्च उचलते.

 क्रेडिट सुविधा बंद  

वित्त विभागाने सांगितले की, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि विमान कंपनीने विमान तिकिटांसाठी क्रेडिट सुविधा बंद केली आहे. केंद्रीय वित्त विभागाने कार्यालयीन निवेदनात म्हटले आहे की, 'सर्व मंत्रालये, विभागांना एअर इंडियाची थकबाकी त्वरित भरण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत एअर इंडियाकडून रोखीने विमान तिकिटे खरेदी करा.