दिल्लीतील बॅटरी कारखान्यात भीषण आग

स्फोटाच्या धमाक्याने इमारतीचा काही भाग कोसळला

Updated: Jan 2, 2020, 10:44 AM IST
दिल्लीतील बॅटरी कारखान्यात भीषण आग title=

नवी दिल्ली : दिल्लीत एका बॅटरीच्या कारखान्यात भीषण आग लागून स्फोट झाला आहे. स्फोटाच्या धमाक्याने इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये ३० गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील पिरागढी परिसरातील इमारतीत बॅटरीचा कारखाना आहे. इमारतीमध्ये काही रहिवासी आणि कारखान्यातील काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमनदलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

बचावकार्यासाठी एनडीआरएफच टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. बॅटरी कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या इमारती खाली करण्यात आल्या आहेत. बॅटरी कारखान्यात केमिकल असल्याने आग सतत वाढत आहे. 

काही दिवसांपासून दिल्लीतील अनेक भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. २६ डिसेंबरलाही दिल्लीतील एका गोदामाला आग लागली होती. आग्निशमन दलाकडून जवळपास ४० लोकांना या आगीतून वाचवण्यात आलं होतं. २३ डिसेंबर रोजी एका कपड्याच्या गोदामाला आग लागली होती. या आगीत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिल्लीतील अनाज मंडीमध्ये एका चार मजली इमारतीला आग लागली होती. या आगीत तब्बल ४३ जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास ६० लोक जखमी झाले होते.