नवी दिल्ली : वाराणसीमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाराणसीमधील कोरोनाचा हा पहिलाचा मृत्यू आहे. गंगापूर येथे राहणाऱ्या या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या रुग्णासह आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास होता. हा रुग्ण 15 मार्च रोजी कोलाकाताहून वाराणसीमध्ये आला होता. या 55 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे कोरोना चाचणी रिपोर्ट समोर आले. त्यात तो पॉझिटिव्ह आला होता.
यापूर्वी त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना बीएचयू रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांचे दोन वेळा सॅम्पल घेण्यात आले. त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र रिपोर्ट आल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.
याआधी वाराणसीमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पाचपैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत 3000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतपर्यंत देशात 75हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी विस्तृत चर्चा झाली असून दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. भारत आणि अमेरिका मिळून आपल्या संपूर्ण ताकदीने कोरोनाविरोधात लढा देण्याबाबत एकमत झालं असल्याचं, पंतप्रधांनानी ट्विटद्वारे सांगितलं आहे.