पाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून सीमारेषेवर दररोज हल्ले, भारतीय जवानांकडून पराक्रमाची शर्थ

भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी या कमांडोंना पिटाळून लावले आहे.

Updated: Apr 16, 2019, 08:13 PM IST
पाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून सीमारेषेवर दररोज हल्ले, भारतीय जवानांकडून पराक्रमाची शर्थ title=

नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर जवळपास दररोज घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमच्या (BAT)कमांडो सातत्याने भारतीय हद्दीत शिरून हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी या कमांडोंना पिटाळून लावले आहे. त्यासाठी भारतीय सैन्याने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार भारतीय सैन्यही पाकिस्तानच्या काही चौक्यांना लक्ष्य करत आहे. 

पाकिस्तानचे BAT कमांडो अनेकदा सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. हल्ला यशस्वी झाला नाही तरी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता येईल, असा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, हा पॅटर्न लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्य अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने आतापर्यंत पाकिस्तानच्या बॅट कमांडोंचा प्रत्येक हल्ला उधळवून लावला आहे. 

यासाठी वेळ पडल्यास भारतीय सैन्यही पाकिस्तानच्या काही चौक्यांना लक्ष्य करत आहे. सीमारेषेवरील कुंपणालगत पाकिस्तानकडून थोडीही हालचाल दिसल्यास भारतीय जवान तात्काळ सक्रिय होऊन प्रत्युत्तर देत आहेत. प्रत्येक हल्ला अयशस्वी ठरत असल्यामुळे आता पाकिस्तानकडून नागरी परिसराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतोय. 

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या बॅट कमांडो पथकांमध्ये नेहमीच्या सैनिकांशिवाय जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनांमधील दहशतवादीही सामील आहेत. त्यांच्याकडून भारतीय चौक्यांवर अचानक हल्ले केले जात आहेत. मात्र, भारतीय जवानही या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सीमारेषेरवरील प्रत्येक सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.