VIDEO: धक्कादायक! भर कार्यक्रमात सिद्धरामय्यांनी महिलेच्या ओढणीवर घातला हात

िवडणूक झाल्यापासून आमचे आमदार मतदारसंघात फिरकलेले नाहीत

Updated: Jan 28, 2019, 05:29 PM IST
VIDEO: धक्कादायक! भर कार्यक्रमात सिद्धरामय्यांनी महिलेच्या ओढणीवर घातला हात title=

बंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या सोमवारी मोठ्या वादात सापडले. सिद्धरामय्यांनी भर सभेत तक्रार करणाऱ्या एका महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांना मोठ्या रोषाचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी संबंधित महिलेने आक्रमकपणे सिद्धरामय्या यांच्यासमोर सरकारच्या अपयशाचा पाढा वाचायला सुरुवात केली. ही महिला सिद्धरामय्या यांचे पूत्र आणि आमदार डॉ. यतींद्र यांच्या मतदारसंघातील होती. निवडणूक झाल्यापासून आमचे आमदार मतदारसंघात फिरकलेले नाहीत, असे या महिलेने म्हटले. यामुळे सिद्धरामय्या यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी महिलेची ओढणी खेचत तिच्या हातामधील माईक हिसकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरीही ही महिला बधली नाही. तिने जोरदारपणे डॉ. यतींद्र यांच्या तक्रारीचा पाढा वाचणे सुरुच ठेवले. अखेर काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत या महिलेला शांत बसवले. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्धरामय्या यांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, सिद्धरामय्या त्यांच्याकडे बघून हसायला लागले. अजूनपर्यंत सिद्धरामय्या यांनी झाल्या प्रकारबद्दल माफी मागितलेली नाही. त्यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

या प्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, सिद्धरामय्या यांचा महिलेशी गैरवर्तन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. महिलेच्या हातामधील माईक काढून घेताना चुकून तिची ओढणी हातात आली, असे राव यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे भाजपसह अन्य विरोधी पक्ष सिद्धरामय्या यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.