IPL Mega Auction: आयपीएल मेगा लिलावात फक्त 75 लाखांची बेस प्राईस असतानाही पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) विकत घेण्यात एकाही संघाने रस दाखवला नाही. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने पृथ्वी शॉला रिलीज केलं होतं. यानंतर त्याला आपल्या संघात घेण्यास कोणीही उत्सुक दिसलं नाही. यादरम्यान पृथ्वी शॉचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पृथ्वी शॉ त्याच्या करिअरदरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य करताना दिसत आहे.
'Focused Indian' या युट्यूब चॅनेलवर तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ तो सोशल मीडियावर होणारी टीका आणि ट्रोलिंग यावर आपलं मत, भावना व्यक्त करताना दिसत आहे. "जर तो मला फॉलो करत नसेल, तर मग ट्रोल कसं करणार? याचा अर्थ त्याचं माझ्यावर लक्ष आहे. ही चांगली बाब आहे," असं पृथ्वी शॉ म्हणाला. यावेली त्याने ट्रोलिंगमुळे भावना दुखावतात हे मान्य करताना संतुलित दृष्टीकोन ठेवत असल्याचं सांगितलं. "मला वाटतं ट्रोलिंग ही फार चांगली बाब नाही, पण ही फार वाईट गोष्टही नाही," असं तो म्हणाला.
पृथ्वी शॉने यावेळी आपण आपल्यावर तयार करण्यात आलेले मिम्स, पोस्ट पाहतो असंही सांगितलं. "जर लोक माझ्यावर मिम्स करत असतील तर मीदेखील ते पाहतो. कधीतरी मला वाईट वाटतं," असं त्याने सांगितलं. यावेळी त्याने आपल्या वाढदिवशी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंर त्यावर होणाऱ्या टीकेचा संदर्भ दिला. "मी काय चुकीचं केलं आहे हे मला समजत नव्हतं. जर मी काही चुकीचं करत असेन तर मला माहिती असतं. पण जर काही चुकीचं केलं नसेल तर ते त्या पद्धतीने दाखवायला हवं," असं पृथ्वी शॉ म्हणाला.
चाहते आणि क्रिकेट समीक्षकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली होती. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वी शॉची बाजू घेतली होती. दुसरीकडे अनेकांनी टीका करण्याऐवजी त्याने कौशल्य आणि कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला दिला.
#PrithviShaw Sad Man To See uR Downfall Really Sad Man #PrithviShaw #ipl2025auction @mipaltan @RCBTweets pic.twitter.com/tuHczWEEgG
— CHANDU (@GREATCHANDU1) November 25, 2024
एका युजरने लिहिलं की, "मला खरोखर आशा आहे की पृथ्वी शॉ आणखी मजबूत परत येईल. चढ-उतार हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्याच्याकडे अजूनही पुनरागमन करण्यासाठी वेळ आहे. तो कुठे चुकला हे त्याला माहीत आहे आणि ती सुधारणं त्याच्यावर अवलंबून आहे.”
दुसऱ्या युजकने लिहिलं आहे की, “पुढील सचिन तेंडुलकर म्हणण्यापासून ते रणजी संघातून वगळणं आणि आयपीएलमध्ये न विकले जाणं. त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मला आशा आहे की तो शिस्तबद्ध होईल आणि पुनरागमन करेल. अगदी शीर्षस्थानी येणं त्याच्यासाठी कठीण आहे. पण किमान देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगले पुनरागमन करा".
माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही पृथ्वी शॉला विकत न घेतल्याबद्दल नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने कशाप्रकारे त्याच्यावर इतकी वर्षं विश्वास दाखवला याबद्दलही सांगितलं. "दिल्लीने पृथ्वी शॉला फार पाठिंबा दिला आहे. तो पॉवरप्लेमध्ये चांगली खेळी करण्यास समर्थ असून, एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारु शकतो. त्याने शिवमला एका ओव्हरमध्ये चार चौकार मारले होते," असं त्याने सांगितलं.
तथापि, त्याने लक्षात आणून दिलं की त्याच्या अफाट क्षमता असूनही, शॉ सातत्याने अपयशी ठरला. “आम्हाला नेहमी वाटत होते की जर शॉ चांगला खेळला तर आम्ही जिंकू आणि आम्ही त्याला अनेक संधी दिल्या,” असं कैफ म्हणाला.