नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं. फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यामुळे प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्टला दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये प्रणव मुखर्जींची तब्येत आणखी खालवली आणि ते कोमामध्ये गेले.
प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातल्या मिराती गावातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रणव मुखर्जी यांच्या वडिलांचं नाव कामदा किंकर मुखर्जी आणि आईचं नाव राजलक्ष्मी मुखर्जी होतं. प्रणव मुखर्जी यांचे वडिल स्वातंत्र्य सैनिक होते. प्रणव मुखर्जी यांच्या वडिलांना ब्रिटिश शासनाविरुद्ध खिलाफत केल्यामुळे १० वर्षांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये घालवावा लागला. प्रणव मुखर्जी यांचं लग्न शुभ्रा मुखर्जी यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
प्रणव मुखर्जी यांनी वीरभूमच्या सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. यानंतर कलकत्ता विश्वविद्यालयात त्यांनी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी कायद्याची डिग्रीही घेतली. प्रणव मुखर्जी वकील आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. प्रणवदांनी बांग्ला प्रकाशन संस्थान देशेर डाकमध्येही काम केलं. तसंच ते बंगीय साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकिर्द जवळपास ५ दशकांची आहे. १९६९ साली प्रणव मुखर्जी राज्यसभा सदस्य झाले. यानंतर १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ सालीही ते पुन्हा राज्यसभेवर गेले. १९७३ साली प्रणवदा केंद्रीय मंत्रिमंडळात उपमंत्री झाले.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या समर्थकांनी त्यांना मंत्रिमंडळात सामील करुन घेतलं नाही. यानंतर काही काळ त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. पण १९८९ साली राजीव गांधींसोबत तोडगा काढल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनिकरण केलं.
नरसिंह राव यांनी प्रणव मुखर्जी यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांची राजकीय कारकीर्द पुनरुज्जिवत झाली. नरसिंह राव यांनी प्रणव मुखर्जी यांना पहिले योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि मग कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त केलं. नरसिंह राव मंत्रिमंडळात १९९५ ते १९९६ या काळात प्रणव मुखर्जी परराष्ट्र मंत्री होते. १९९७ साली त्यांची सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवड झाली.
प्रणव मुखर्जी काँग्रेसचे संसदीय दल आणि काँग्रेस विधायक दलाचे नेतेही राहिले होते. लोकसभा निवडणुकीआधी जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बायपास सर्जरी केली, तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय सोबत मंत्रिमंडळ चालवण्याची जबाबदारी पार पाडली. १९९१ ते १९९६ साली ते योजना आयोगाचे उपाध्यक्षही राहिले.
प्रणव मुखर्जी यांना २००७ साली भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषणने सन्मानित करण्यात आलं. तर मोदी सरकारने २०१९ साली प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न दिला.