माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

२०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. 

Updated: Sep 27, 2020, 09:29 AM IST
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: गेल्या सहा वर्षांपासून कोमात असलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. २०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. 

जसवंत सिंह यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. जसवंत सिंह यांनी आधी लष्करात आणि त्यानंतर राजकारणात राहून देशाची परिश्रमपूर्वक सेवा केली. अटलजींच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबादारी होती. त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करून जसवंत सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, बौद्धिक क्षमता आणि देशसेवेसाठी जसवंत सिंह हे कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

२००९ साली मोहम्मद अली जिना यांची स्तुती केल्यामुळे जसवंत सिंह यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले होते. परंतु, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जसवंत सिंह यांनी भाजपपासून पुन्हा फारकत घेतली होती. त्यांनी राजस्थानच्या बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपच्या कर्नल सोना राम  यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.