कुख्यात गुंड छोटा राजन कोरोना पॉझिटीव्ह, एम्समधील उपचारावर प्रश्नचिन्ह

2015 मध्ये अटक झाल्यापासून 61 वर्षाच्या राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद

Updated: Apr 27, 2021, 08:53 AM IST
कुख्यात गुंड छोटा राजन कोरोना पॉझिटीव्ह, एम्समधील उपचारावर प्रश्नचिन्ह title=

मुंबई : अंडरवर्ल्ड कुख्यात गुंड राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजनला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्याला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये दाखल केले गेले आहे. तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी सोमवारी येथील सत्र न्यायालयात ही माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे, इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पणानंतर 2015 मध्ये अटक झाल्यापासून 61 वर्षाच्या राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य माणसाला ऑक्सिजनची कमतरता आणि रुग्णालयात बेड हवाय. रुग्णांची कुटुंब अस्वस्थ आहेत. अशी परिस्थिती असताना अंडरवर्ल्ड डॉनला रुग्णालयात बेड कसा मिळाला ? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त करून तीव्र निषेध व्यक्त केलाय. 

राजनच्याविरोधात मुंबईत दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. त्याला कोरोना संसर्ग झाल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजनला न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही, असे तिहारच्या सहाय्यक जेलरने सोमवारी दूरध्वनीद्वारे सत्र न्यायालयात सांगितले.

छोटा राजनला कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची तपासणी झाली. गुरुवारी छोटा राजनला संसर्ग झाल्याची बातमी समोर आली. छोटा राजनला संसर्ग झाल्यावर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोनाची चाचणी करून होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले.