#ManoharParrikar : '....आणि माझ्याबरोबर असणारे माझे सगळे माझ्यापासून दूर जात होते'

मी मनोहर पर्रिकर... हे माझं आयुष्य...

Updated: Mar 18, 2019, 09:34 AM IST
#ManoharParrikar : '....आणि माझ्याबरोबर असणारे माझे सगळे माझ्यापासून दूर जात होते' title=

पणजी : जनतेत राहून जनतेसाठीच राजकारणात अगदी शेवटच्या श्वापर्यंत कार्यरत राहणाऱ्या मनोहर पर्रिकर यांनी रविवारी, १७ मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी यगाचा निरोप घेतला. राजकीय पटलावर एक प्रभावी व्यक्तीमत्व आणि अत्यंत कर्तव्यदक्ष असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सारा देश हळहळला. कोणी आपला माणूस गमावला तर, कोणी सच्चा मित्र. असे पर्रिकर स्वत: त्यांच्या आयुष्याकडे नेमके कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे हे त्यांच्या शब्दांतून अनुभवूया.... 

निमित्त होतं पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं... ठिकाण होतं राजभवनाचा हॉल... 

लेखक : मनोहर पर्रीकर … 

राजभवनाचा हॉल कार्यकर्त्यांनी पूर्ण भरून गेला होता. गोव्यात भाजप पहिल्यांदाच सत्तेत येत आहे हे बघून सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्या जवळचे मित्र, गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले असंख्य कार्यकर्ते शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमात दिसत होते. या साऱ्यांनी एकत्र येण्यास निमित्त होतं  ते मी मुख्यमंत्री बनण्याचं, शपथविधी सोहळ्याचं. त्या गर्दीत माझी दोन मुलं, बहीण-भावंडं दिसत होती. तरीही ते समोर दिसणारं चित्र अपुरं होतं. माझी पत्नी आणि माझे आई-वडील यांच्यापैकी कोणीही त्यात नव्हते. त्यांची तीव्रतेनं आठवण येत होती.  ज्याची मी देखील कधी कल्पना केली नव्हती ते सत्यात उतरताना आनंद तर झालाच होता पण त्या आनंदाला दुःखाची किनार होती.

नियतीचा खेळ किती अजब! एका वर्षात टप्प्याटप्प्यानं माझ्या जवळची हि माणसं माझ्यापासून कायमची दूर गेली. मेधाच्या बाबतीत हेच घडलं. अतिशय वेगवानपणे तिचा आजार बळावत गेला. कोणताही पुरेसा वेळ न देता तो आजार तिला आमच्यापासून कायमचं दूर घेऊन गेला. १९९४साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. माझ्यासाठी पणजी मतदारसंघ निवडण्यात आला. पणजी हा ‘हारणारा’ मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध होता. अशा मतदारसंघात मला उमेदवारी देण्यात आली होती. राजकीय जीवनात यशाची एकेक पायरी चढत होतो आणि माझ्याबरोबर असणारे ‘माझे’ सगळे माझ्यापासून दूर जात होते.