Retirement Update: केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय आणि पेन्शनची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत सांगण्यात आलं आहे. यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही (Universal Pension Income Programme) सुरू करण्यात यावी असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा
अहवालानुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी असं नमुद केलं आहे. तसंच देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारसही केली आहे.
कौशल्य विकासही महत्त्वाचा
या अहवालानुसार कार्यरत वयाची लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केलं जाऊ शकते. अहवालात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही सांगितलं आहे.
सरकार ठरवणार धोरण
केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे या अहवालात म्हटलं आहे. असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश व्हायला हवा, त्यांना प्रशिक्षण दिलं जावं असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.
जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 अहवाल
वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत जाईल. वर्ष 2019 मध्ये, भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.