बडोदा महामार्गामुळं पनवेल- बदलापूरचे अंतर कमी होणार; दीड तासाचा प्रवास 10 मिनिटांत होणार

Badlapur To Panvel Tunnel: पनवेलवरुन बदलापूरला जाणे आता सोप्पं होणार आहे. काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या?

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 26, 2024, 09:25 AM IST
बडोदा महामार्गामुळं पनवेल- बदलापूरचे अंतर कमी होणार; दीड तासाचा प्रवास 10 मिनिटांत होणार  title=
maharashtra longest Tunnel to Reduce Travel Time Between Badlapur And Panvel to 10 Minutes to be ready in 2025

Badlapur To Panvel Tunnel: मुंबई किंवा पनवेलमार्गे बदलापूरला जायचं म्हणजे एक ते दीड तास लागतो. मात्र, आता लवकरच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील माथेरानच्या डोंगराखालील पहिल्या बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या 25 जुलैपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नव्या वर्षात बदलापूरवरुन पनवेलला अवघ्या 20 मिनिटांत पोहोचता येणार आहे. त्यामुळं प्रवशांची फरफट आणि वेळदेखील वाचणार आहे. 

दिल्लीला जोडणारा मुंबई-बडोदा महामार्ग पनवेल आणि नवी मुंबई विमानतळ तसेच जीएनपीएला जोडण्यात येणार आहे. पुढील नऊ महिन्यात या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. माथेरानच्या डोंगरातील शिरवली गावाजवळ सुमारे सव्वाचार किमीच्या अंतरावर दुहेरी बोगद्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले असून शेवटच्या पॅकेज क्रमांक 17 चे सरासरी 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्याच चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंजसुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे.

बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पॅकेज क्रमांक 17 हा 9.6 किमी अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे. सध्या पनवेलमार्गे बदलापूरला जाण्यासाठी ठाणे-डोंबिवली असा लोकलने प्रवास करावा लागतो. मात्र आता या महामार्गामुळं प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होणार आहे. 

हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळं बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत करता येणार आहे. तर, बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटांत करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसंच, या महामार्गामुळं पनवेलची आर्थिक समृद्धीदेखील होणार आहे.