नवी दिल्ली : तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन्स थांबल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. अशाच प्रकारे एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवर काही तास उभी होती. मात्र, त्यामागचं कारण कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
उत्तर प्रदेशातील हाथरस सिटी रेल्वे स्थानकावर एक मालगाडी १०-१५ मिनिटे नाही तर तब्बल पाच तास थांबवण्यात आली होती. कुठल्याही तांत्रिक कारणामुळे ही गाडी थांबवण्यात आली नव्हती तर गाडीच्या ड्रायव्हरला झोप आल्याने त्याने गाडी थांबवली.
इतका वेळ गाडी थांबल्यानंतरही ड्रायव्हरची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या ड्रायव्हरला आणि गार्डला बोलावलं. त्यानंतर तब्बल पाच तासांनी ती मालगाडी तेथून रवाना झाली.
शनिवारी सकाळी मालगाडी हाथरस स्थानकावर दाखल झाल्यानंतर ड्रायव्हर झोपण्यासाठी गेला. त्यानंतर गाडी ४ तास ४० मिनिटांपर्यंत उभी होती. मग, २० मिनिटांनी दुसरा ड्रायव्हर आणि गार्ड आला. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली.
मालगाडी ट्रॅकवर उभी राहील्यामुळे फाटक बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला होता. तसेच सामान्य नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.