मुंबई : गूगल (Google) आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दिवसभरात आपण गूगलचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. गूगलवर मोठ्या प्रमाणावर विविध गोष्टींचा शोध घेतला जातो. गूगलवर 'भारतातील सर्वात खराब भाषा कोणती' (Ugliest Language in India) असं सर्च केल्यास कन्नड असं दाखवलं जात आहे. यानंतर कन्नड भाषिकांनी सोशल मीडियावर या प्रकारचे अनेक स्क्रीनशॉट शेअर करत गूगलवर जोरदार हल्ला चढवला. हा सर्व प्रकार इतका टोकाला गेला की राज्य सरकारने थेट गूगलला नोटीस धाडण्याचा इशारा दिला आहे. मात्र गूगलने कन्नड भाषिकांची ट्विटद्वारे माफी मागितली आहे. (Google apologizes to Kannada speakers for showing google search Kannada as worst language)
साधारणपणे अनेक नेटीझन्सने एकच गोष्ट गूगलवर सर्च केल्यास तसाच अल्गोरिदम सेट होतो. त्यामुळे अनेक वेळा गूगलवर अनपेक्षित उत्तर दाखवली जातात. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांचे वय 120 वर्ष दाखवण्यात आले होते. याच प्रकारे अनेकांनी गूगलवर 'भारतातील सर्वात खराब भाषा कोणती' असं सर्च केलं. त्यावर 'कन्नड' असं दाखवण्यात आलं. यामुळे कन्नडिंगानी हे स्क्रीनशॉट शेअर करत गूगलला चांगलेच फैलावर घेतलं.
इतकच नाही तर कर्नाटकमधील विविध महत्वाच्या नेत्यांनीही या सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
"गूगलने घडल्या प्रकाराबाबत कन्नड भाषिकांची माफी मागावी. हा कन्नडिगांच्या गौरवाचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. कन्नड भाषेचा इतिहास हा 2500 हजार वर्षांपासूनचा आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या प्रकारामुळे गूगलने कन्नडिगांच्या गौरवाला ठेच पोहचली आहे. यामुळे गूगलने जाहीर माफी मागावी", अशी मागणी कर्नाटकचे वनमंत्री अरविंद लिंबावलीने केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं.
या सर्व प्रकारानंतर गूगलने नमतं घेत अखेर माफी मागितली आहे.
गूगलने काय म्हटलंय?
"गूगलला विचारले जाणारे प्रश्न नेहमीच परिपूर्ण नसतात. गूगलवर अनेकदा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अनपेक्षित उत्तर समोर येतात, हे बरोबर नाही. याबाबतची कल्पना आम्हाला आहे. या चूका लक्षात आल्यानंतर आम्ही त्यात बदल करतो. गूगलवर सर्च रिझल्टमध्ये दाखवण्यात येणारे उत्तरं ही आमची मतं नसतात. पण या गैरसमजासाठी आणि कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या, यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो", असं गूगलने आपल्या माफीनाम्यात स्पष्ट केलं आहे.
We apologize for the misunderstanding and hurting any sentiments. pic.twitter.com/nltsVezdLQ
— Google India (@GoogleIndia) June 3, 2021
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षण : कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसीसह समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
सर्वाधिक पाहिला गेलेल्या VIDEO म्हणून गिनिज बुकात नोंद, पण आहे तरी काय व्हीडिओत?