मुंबई : गुगलने आज डूडलच्या माध्यमातून नाशिकमध्ये जन्मलेल्या कार्नेलिया सोराबजी यांचा सन्मान केलाय.
कार्नेलिया सोराबजी यांना भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर होण्याचा सन्मान मिळाला होता. त्या एक अॅडव्होकेट असण्यासोबतच एक समाजसुधारक आणि लेखिकाही होत्या. कार्नेलिया सोराबजी यांच्या नावावर अनेक उपलब्धी आहेत. त्या भारतात आणि लंडनमध्ये वकिली प्रॅक्टीस करणा-या पहिला महिलाच नाहीतर त्या बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट होणा-याही पहिल्या तरूणी होत्या. तसेच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या महिला आणि ब्रिटीश युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या भारतीय होत्या.
१५ नोव्हेंबर १८६६ मध्ये जन्मलेल्या कार्नेलिया १८९२ मध्ये नागरी कागद्याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या होत्या आणि १८९४ मध्ये परतल्या. त्यावेळी समाजात महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. अशातही कर्नेलिया यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन अॅडव्होकेट होण्याचे ठरवले. त्यांनी महिलांना वकिली पेशात जागा मिळावी यासाठी लढा दिला. आणि त्यांना १९०७ मध्ये यात यशही मिळालं. त्यांना बंगाल, बिहार, ओडीसा आणि आसाममधील न्यायालयांमध्ये सहायक महिला वकिल पद देण्यात आलं होतं.
१९२९ मध्ये कार्नेलिया या एक वरिष्ठ वकिल म्हणून निवॄत्त झाल्या. कार्नेलिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक महिला पुढे आल्या आणि वकिली पेशा त्यांनी अंगिकारला. १९५४ मध्ये कार्नेलिया यांचं निधन झालं. त्यावेळी त्या ८८ वर्षांच्या होत्या. मात्र आजही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना केवळ भारतातच नाही तर ब्रिटनमध्येही सन्मानाने बघितलं जात होतं. त्यांनी इंडिया कॉलिंग(१९३४) आणि इंडिया रिकॉल्ड(१९३६) या दोन आत्मकथाही लिहिल्या होत्या.