"आरक्षणावर नोकरी मिळवलीय का?"; न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नावरुन नवा वाद

Reservation : योग्यता असतानाही आरक्षणामुळे संधी न मिळाल्याची चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. त्यामुळे अनेकदा वाद विवादही झाल्याचे पाहायला मिळतात

Updated: Dec 7, 2022, 11:51 AM IST
"आरक्षणावर नोकरी मिळवलीय का?"; न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नावरुन नवा वाद title=

Reservation : आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्या, इतर सवलती यावरुन देशभरात सातत्याने वाद, चर्चा आणि विरोध होत आलाय. अनेक जण सक्षम किंवा त्यासाठी योग्य असतानाही आरक्षणामुळे त्यांना संधी मिळत नाही आणि त्या जागी दुसऱ्याची नेमणूक होते अशी चर्चा नेहमीच होताना दिसते. काही वेळा या चर्चेचे वादातही रुपांतर होतं. अनेकदा आरक्षणाच्या लाभावरुन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून उघडपणे टीका केली जाते. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये समोर आलाय. बिहारच्या (Bihar) पाटणा हायकोर्टात न्यायमूर्तींनी थेट सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही आरक्षणावर इथे आलात का असा सवाल केला. त्यानंतर कोर्टरुमधील वकील देखील हसायला लागले. 

पाटणा उच्च न्यायालयाच्या (Patna High Court) न्यायमूर्तींनी आरक्षणाची खिल्ली उडवणाऱ्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या खंडपीठाच्या 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईचा लाइव्ह स्ट्रीमचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये न्यायमूर्ती हे बिहार सरकारचे जिल्हा भूसंपादन अधिकारी  अरविंद कुमार भारती यांच्याशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करत होते. खटल्याचा निकाल लागलेला नसताना अधिकारी अरविंभूसंपादनाची भरपाई कशी दिली हे स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

आरक्षणावर नोकरी मिळाली आहे का?

सुनावणी सुरु असताना या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे कोर्टाला सांगण्यात आले. यावेळी पक्षकारांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देत न्यायमूर्ती कुमार यांनी या प्रकरणाला स्थगिती दिली. त्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला, "अरविंद कुमार भारती, तुम्हाला आरक्षणावर नोकरी मिळाली आहे का? असा सवाल केला. यावर त्या अधिकाऱ्याने हो असे उत्तर दिले.

 आता तरी समजून घ्या साहेब 

अधिकारी कोर्टरुमच्या बाहेर जाताच इतर वकील हसू लागले. एका वकिलाने तर आता तरी समजून घ्या साहेब असे म्हटले. दुसर्‍या एका वकिलाने दोन नोकर्‍यांएवढी संपत्ती जमा केली असेल असे म्हटले. यानंतर न्यायमूर्तींनी, "नाही नाही या लोकांकडे काही नसते. जे पैसे या बिचाऱ्याने जमा केले असतील ते सर्व केले असतील," असे म्हटले. त्यानंतर पुन्हा सर्व वकील हसू लागले.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर न्यायमूर्तींच्या वर्तणुकीवरुन जोरदार टीका केली जात आहे.