नवी दिल्ली : भीम अॅपचा वापर करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने भीम कॅशबॅक योजनेचा कालावधी पूढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या दुकानदारांना १,००० रूपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की, भीम कॅशबॅक योजना ३१ मार्च, २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखीने व्यवहार करणाऱ्या वर्गाला डिजिटल क्रांतीत आणण्यासाठी भीम अॅपची योजना १४ एप्रिलला सुरू केली होती. या योजनेला आता सहा महिने लोटले आहेत.
या योजनेच्या माध्यमातून सुरूवातीला २० ते ५० रूपयांच्या व्यवहारांवर ५० रूपयांपर्यंत परतावा मिळत असे. मात्र, त्यानंतर ही रक्कम ९५० रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, त्यापूढच्या प्रत्येक व्यवहारावर दोन रूपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. भीम कॅशबॅक योजनेची मासिक मर्यादा १,००० रूपये इतकी आहे. या योजनेअंतर्गत अट ही आहे की, दुकानदाराला कमीत कमी २० व्यवहार भारत इंटरफेस फॉर मनी (भीम अॅप) द्वारे करायचा आहे. तसेच, हा व्यवहार कमीत कमी २५ रूपयांचा असावा लागणार आहे.