स्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट

ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 22, 2017, 06:38 PM IST
स्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट title=

मुंबई : ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समाजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.

आरव अप्पूकुट्टन (वय ४६) आणि सुकन्या कृष्णन (वय २२) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही एकाच शहरातील असून, त्यांची मातृभाषाही एकच आहे. त्यांच्या लग्नाची गोष्ट मोठी रंजक आणि सामाजाला वेगळे वळण देणारी आहे. दोघांची पहिली भेट एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे.‘स्टोरीपिक’ने दिलेल्या वृत्तानुसार चंदू आणि बिंदू या दोघांनाही आपल्या शरीरात काहीतरी गडबड आहे असे जाणवायचे. आपला देह ज्या लिंगात मोडतो त्यात आपण कंफर्टेबल नाही आहोत. आपल्या मनातील भावना काहीतरी वेगळेच सांगते आहे, याची जाणीव झाली होती. थोडक्यात काय तर, केरळमध्ये जन्माला आलेल्या बिंदूला आपण स्त्रीच्या शरीरात अडकलेला पुरुष आहोत, याची जाणीव झाली. दुसरीकडे चंदू म्हणून जन्माला आलेल्या तरुणाची आपलं शरीर पुरुषाचं असलं, तरी महिला असल्याची भावना बळावली. योगायोग असा की आपण सेक्स चेंज करून घ्यावे ही भावना दोघांच्याही मनात बळावली.

दरम्यान, दोघेही सेक्सचेंज (लिंगबदल) करून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जिथे त्यांची पहिली भेट झाली. महत्त्वाचे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट झाली ते हॉस्पीटल समाजातील सर्व स्तर दाखवणाऱ्या आणि त्यांना सामावून घेणाऱ्या मायानगरी मुंबईत आहे.  हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा दोघेही एकमेकांना अनोळखी होते. त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता. तर, संवाद कुठून होणार? पण, गंमत अशी की, रूग्णालयात चंदूला एक फोनकॉल आला. फोनवर बोलताना चंदू अस्खलीत मल्याळी बोलत होता. इथेच त्यांच्यातील पहिला सूर जूळला. कारण बिंदूही मल्याळी होती. भाषीक धागा जमल्यावर दोघांच्यात संवाद सुरू झाला. संवादादरम्यान दोघेही एकाच शहरातून आल्याचं त्यांना समजलं.

दरम्यान, हॉस्पीटलमध्ये भेटलेल्या त्या कालावधीत त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. कालांतराने फोनवरचे बोलणे प्रत्यक्ष भेटीत बदलले. ही भेट पूढे प्रेमात रूपांतरीत झाली. जी आता विवाहबंधनात अडकणार आहे. खरेतर तो तिच्यापेक्षा वयाने दुप्पट पण दोघांमध्ये त्यामुळे काही अडत नाही. त्यांच्यात हा मुद्दा कधी आलाच नाही. त्यांच्यातील प्रेमाने सर्व सीमा पार केल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात दोघांनीही आपापली नावे बदलून घेतली आहेत. त्यानुसार बिंदूचे रूपांतर आरवमध्ये तर, चंदूचे रूपांतर सुकन्यामध्ये झाले आहे.

पूढच्या महिन्यात दोघेही विवाहबंधनात अडकत आहेत. एका साध्या मंदिरात विधीपूर्वक विवाह करायचा दोघांचीही इच्छा आहे. विशेष म्हणजे दोघांच्याही कुटूंबियांकडून त्यांना पाठिंबा आहे. दोघांनी भविष्याबाबत अनेक स्वप्ने पाहिली आहेत. तसेच, त्याप्रमाणे नियोजनही केले आहे. हे नियोजन इतके सुक्ष्म आहे की, सर्जरीनंतर गर्भधारणा शक्य नाही हे माहित असल्यामुळे त्यांनी मूल दत्तक घ्यायचा विचार केला आहे.