नवी दिल्ली : सरकारकडून देशभरात सर्व विमानतळ आणि एअरलाइन्ससाठी शनिवारी अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विमानतळावरील सुरक्षेत तसेच आधी असलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे सांगण्यात आले आहे. पुलवामा हल्ला अणि त्यानंतर झालेल्या घटनांमुळे सरकारकडून सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारकडून राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व एअरलाईन्स आणि विमानतळांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेत वाढ करण्याचे सांगण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या घटना आणि गुप्तचर माहितीनंतर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 'बीसीएएस'ने एअरलाईन्स आणि विमानतळांवरील २० विशिष्ट सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत सुरक्षा तैनात ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. विमानतळाच्या वाहनतळात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करावी. तसेच विमानतळासमोर कोणतेही वाहन उभे न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताकडूनही एअर स्ट्राईक करण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. गेल्या एका आठवड्यापासून पाकिस्तानकडून सीमारेषेवर ६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच आतापर्यंत आठ वेळा भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या घटमोडींच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.