Uddhav Thackeray Interview: निवडणुकीचा प्रचार संपायला फक्त 48 तास शिल्लक आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेची महामुलाखत झी 24 तासला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार सुरु झाला तेव्हापासून माझा प्रचार सुरु झाला. मी मुख्यमंत्री असताना कटेंगे-बटेंगे नव्हते. त्यांची सत्ता जिथे होती तिथेच लुटेंगे बाटेंगे आहे. आणि हीच त्यांच्या पक्षाची भूमिका. भाजप हा संकरित पक्ष आहे. माझं सरकार होतं तेव्हा हिंदू कुठे कापला गेला? मोदींच्या राज्यात असं होत असेल तर मोदी अकार्यक्षम आहेत. 10 वर्षे होऊनदेखील त्यांना हे वाटत असेल तर त्यांनी पद सोडलं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.
महिलांना रोजगार मिळत नाही, रोजगार गुजरातला जातायत यावर ते का बोलत नाहीत? कुठे एअरपोर्टचे छत गळतंय, राम मंदिर गळतय आता त्यांचे तुटेंगे तो फटेंगे सुरु आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे भाषण जनतेच्या प्रश्नाशी संबंधित नव्हते. यावेळेस उद्धव ठाकरेंवरच्या टिकेची धार कमी झाली कारण त्यांना लोकसभेला उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.
शिवसेना स्थापनेचा मुद्दा पुन्हा भाषणात आहे. कारण मोदी-शहांमुळे गुजरात आणि इतर देशांमध्ये भिंत बांधली गेलीय. गुजरात देशाचा एक भाग आहे. पण यांनी गुजरातला वेगळं केलंय. माझ्या महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. इथल्या गुजरातींनाही तो रोजगार मिळेल. त्यांचीही रोजीरोटीही त्यांनी नेली. मी महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला नेऊ देत नव्हतो. महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी त्यांनी माझं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
मी सोबत होतो तेव्हा त्यांची लुटालूट होत नव्हती. आता ते ओरबाडून खायला चाललेयत. आता देशाच्या राजधानीला ते संपवायला निघालेत. 2014-2019 पासून जेव्हा नेतृत्व बदललं, तेव्हापासून आमचा विरोध सुरु झाला. त्यांच्या लुटीत त्यांना उद्धव ठाकरे अडथळा वाटत होता, असे ते म्हणाले.मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला अनेक गोष्टी माहिती होत्या. कोण कपडे बदलून जात होतं, त्यांची माहिती मला होती. पण या गद्दारांना मला जाण्यापासून अडवायचे नव्हते. म्हणून त्यांना जाऊ दिलं. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना अडवू शकलो असतो, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
2014 ला युती मी तोडली नव्हती. एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं तुम्ही फोन करा आणि सांगा युती तोडली. 2019 ला त्यांनी दिलेला शब्द मोडला. माणूस एवढा कसा बिघडू शकतो, हे पाहून मला वाईट वाटलं. त्यांनी माझ्या शब्दाला किंमत नाही दिली, असे ते फडणवीसांबद्दल म्हणाले. महाराष्ट्रद्रोह सोडा, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही, हे जाहीर करा. यांच्या नसानसातला महाराष्ट्रद्रोह जाणार नाही. त्यामुळे पुढे जाऊन एकत्र येण्याची शक्यता नाही, असे ठाकरे म्हणाले.
पुन्हा पदरात घ्या असे काही फुटलेल्या आमदारचे मत होते. पण ज्यांचे दर ठरलेयत त्यांना मला घ्यायचे नाही. आता नवे चेहरे उभे राहिले आहेत. मशाल हे चिन्ह आताच्या काळात योग्य चिन्ह आहे. पवार साहेब जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री करु इच्छित असेल तरी मला काही आक्षेप नाही. केवळ महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री नको. सोयाबीन, कांदा, महिला सुरक्षितता, शिक्षण, मोफत एसटी प्रवास, रेल्वे प्रवास असे मुद्दे निवडणुकीत असायला हवेत. मुख्यमंत्री म्हणतात, आमचा जाहीरनामा चोरलाय. त्यांनी माझा पक्ष चोरलाय मी त्याचा जाहीरनामा काय चोरु? असा टोला त्यांनी लगावला.
माहिममध्ये अमित ठाकरे निवडणुकीला उभे असताना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार का दिला? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना,'माहिममध्ये उमेदवार का द्यायचा नाही? तिथे महाराष्ट्रद्रोही आहेत. मनसे नाही गुनसे आहे.गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना. ते गुजरातला मदत करणारे आहेत, असा अर्थ त्यांनी सांगितला.